आरोग्यमुख्य बातमी

धामणसे येथे महिलांसाठी अत्याधुनिक कॅन्सर स्क्रीनिंग व बाल आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : तालुक्यातील धामणसें गावातील महिलांच्या आरोग्य जनजागृतीसाठी तसेच बालआरोग्य संवर्धनासाठी JTI जोशी टेक्नॉलॉजी इंटरनॅशनल (अहमदाबाद) यांच्या CSR उपक्रमांतर्गत आणि श्री रत्नेश्वर ग्रंथालय यांच्या प्रतिनिधित्वाखाली डी. एम. जोशी सभागृह, धामणसें येथे विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन केले होते. सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दि. १८, १९ आणि २० मे रोजी महिलांसाठी अत्याधुनिक कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली होती. या माध्यमातून महिलांची ब्रेस्ट कॅन्सर संदर्भातील तपासणी करण्यात आली. शिबिराचा शुभारंभ धामणसें ग्रामपंचायतीच्या लोकाभिमुख उपसरपंच सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, महिला भगिनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तपासणीपूर्वी प्रत्येक महिलेला समुपदेशन करून कॅन्सरविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. बदलते वातावरण, दूषित अन्नपदार्थ, वाढता रासायनिक वापर तसेच कीटकनाशकयुक्त अन्नधान्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची जाणीव महिलांना करून देण्यात आली. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्य तपासणीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, आजाराचे वेळेत निदान व्हावे आणि योग्य उपचार घेण्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अवघ्या वीस मिनिटांत ही तपासणी पूर्ण होत होती. या शिबिरामध्ये तब्बल १४० महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली.

श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश किशोर कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चिटणीस मुकुंद गणेश तथा बाळासाहेब जोशी, उपाध्यक्ष विलास पांचाळ, संचालक विश्वास धनावडे, अनंत जाधव, प्रशांत रहाटे, संचालिका स्मिता कुळकर्णी, ग्रंथपाल केशव कुळकर्णी, लिपिक अविनाश लोगडे व अन्वी वारशे यांनी विशेष परिश्रम घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. नियोजन, जनजागृती, महिलांशी संवाद तसेच शिबिराचे व्यवस्थापन या सर्व बाबींमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका तसेच बचत गटाच्या महिलांच्या सहकार्यामुळेच संपूर्ण उपक्रम शिस्तबद्ध, प्रभावी व यशस्वीपणे पार पडला.

तळेगाव दाभाडे येथील Oncho Hospital कडून अत्याधुनिक स्क्रीनिंग व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली होती. मेडिकल टीममध्ये एकता महाडीक, डॉ. दिव्या सिंग, नम्रता यादव आणि सोनाली महाडीक या उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करून तपासणी प्रक्रिया अत्यंत संयमाने आणि व्यवस्थितपणे पार पाडली. महिलांनी देखील मोठ्या विश्वासाने या उपक्रमात सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे आयोजन Selfless Serving Society या संस्थेमार्फत करण्यात आले होते. संस्थेच्या वतीने कोनिका लिशॉय, कीर्ती परांजपे आणि सुनीता सबलोक या उपस्थित होत्या. तसेच धामणसे गावातील आशा सेविका व अंगणवाडी कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन महिलांमध्ये जनजागृती केली आणि अधिकाधिक लाभार्थींना शिबिराचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग नोंदविला गेला.

दि. १९ मे रोजी ० ते ६ वयोगटातील मुलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते. रत्नागिरी येथील डॉ. रोहित यांनी मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या प्रकृतीची सखोल चौकशी केली. उंची, वजन व पोषणमूल्यांच्या आधारे योग्य आहार, संगोपन आणि आरोग्यदायी सवयींबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात ० ते ६ वयोगटातील सुमारे ७० मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील बालकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

JTI जोशी टेक्नॉलॉजी इंटरनॅशनल ही संस्था धामणसे गावासाठी दरवर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवत असते. त्यांच्या CSR निधीतून अशा उपयुक्त व समाजहिताच्या शिबिरांचे आयोजन करून ग्रामस्थांना आधुनिक आरोग्यसेवेचा लाभ उपलब्ध करून दिला जात असल्याबद्दल ग्रामस्थांनी संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा यावेळी ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!