मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण

मराठा ओबीसी आंदोलनामुळे वैभव खेडेकरांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा भाजपा पक्ष प्रवेश काही दिवसातच होईल

उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे व दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची माहिती

चिपळूण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा मुंबई येथे आज (४ सप्टेंबर) भाजपा पक्षात प्रवेश होणार होता; मात्र, मराठा व ओबीसी आंदोलनामुळे हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला आहे. येत्या काही दिवसांतच वैभव खेडेकरांसह समर्थकांचा भाजपात जाहीरपणे पक्षप्रवेश होणार असून या सर्वांचे भाजपात उत्स्फूर्तपणे स्वागत केले जाणार असल्याची माहिती भाजपा, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे व दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांनी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह काहींना पक्षातून बडतर्फ केल्या असल्याचे पत्राद्वारे जाहीर केले. या कारवाईने वैभव खेडेकर यांनाही मोठा धक्का बसला. ज्या पक्षासाठी २० वर्ष जीवाचे रान करून एकनिष्ठ राहिलो. त्याच पक्षाने एक प्रकारे बडतर्फीच्या कारवाईने निष्ठेचे फळच दिल्याची भावना खेडेकर यांनी बोलून दाखवली. यानंतर वैभव खेडेकर कोणत्या पक्षात प्रवेश करणार या संदर्भात चर्चा होत असतानाच मत्स्य उद्योग मंत्री ना. नितेश राणे यांनी गणेशोत्सव काळात खेड दौऱ्यात वैभव खेडेकर ४ सप्टेंबर रोजी नरीमन पॉईंट मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश होणार असल्याचे जाहीर केले.

यानुसार वैभव खेडेकर यांना पाठिंबा देत मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पदासह सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. यानंतर वैभव खेडेकर यांनी मुंबई भाजपा पक्ष प्रवेशासाठी जय्यत तयारी देखील केली होती. शेकडो समर्थकांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना होणार होता. मात्र, मराठा व ओबीसी आंदोलनामुळे हा पक्षप्रवेश काही दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती मोरे व सावंत यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत यादव यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर आता मनसेचे वैभव खेडेकर यांच्यासह समर्थकांचा भाजपा पक्ष प्रवेश होणार असल्याने भाजपाला अधिक बळ मिळणार असल्याचे देखील मोरे व सावंत यांनी यावेळी सांगितले. वैभव खेडेकर यांच्यासह समर्थकांचे भाजपा पक्षात स्वागत असून आम्ही सर्वजण भाजपा पक्ष आणखी मजबूत करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे व दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!