मुख्य बातमी

जिल्हा शासकीय रुग्णालयातील दुरावस्था आणि रुग्णांच्या गैरसोयीबाबत ठाकरे शिवसेनेची नाराजी

रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना निवेदन सादर : आठ दिवसांत सर्व समस्या सोडवण्याची मागणी, दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील दुरावस्था आणि रुग्णांच्या गैरसोयीबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णालयातील विविध गंभीर समस्यांवर त्वरित मार्ग काढण्यासाठी शहरप्रमुख प्रशांत शंकरराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना आज (२७ मे) एक निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे येत्या ८ दिवसांत येथील सर्व समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली असून, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.

यावेळी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्यासहित उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, नगरसेवक केतन शेट्ये, अमित विलणकर, तसेच विभागप्रमुख राजाराम रहाटे, संदेश भिसे, रोहित मयेकर, तन्वीर मुजावर, दिलावर गोदड, सुफियान जयगडकर, प्रसन्न सुर्वे, रोहन वारेकर, मंदार, अमन राणे आणि गौरव कळंबटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रुग्णालयात सध्या एक्स-रे फिल्मचा तुटवडा जाणवत असून रुग्णालयात एक्स-रे फिल्म उपलब्ध नसल्याने गरीब रुग्णांना बाहेरून महागडे एक्स-रे काढून घ्यावे लागत आहेत. रुग्णालयातील स्वच्छतागृहे पूर्णपणे भरलेली असून तिथे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आपत्कालीन आणि अपघात विभागाची स्थिती अतिशय वाईट आहे. गंभीर रुग्णांवर वेळेत आणि योग्य उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. रुग्णालयात कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांऐवी कंत्राटी वॉर्ड बॉय काम करत आहेत. त्यामुळे रुग्णांची सेवा योग्य प्रकारे होत नाही. तसेच रुग्णालयाच्या आवारात वाहने उभी करण्यासाठी कोणतीही शिस्तबद्ध व्यवस्था नाही. यामुळे रुग्णवाहिकांनाही येण्या-जाण्यास अडथळा निर्माण होतो.

या सर्व समस्यांकडे ठाकरे शिवसेनेने लक्ष वेधले असून या सर्व समस्या ८ दिवसांत सोडवण्यासाठी प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ थांबवून प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!