पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे दादरमध्ये मोठे आंदोलन व रास्ता रोको
पेट्रोल डिझेल आहे तर पेट्रोल पंपावर रांगा कशासाठी आहेत? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी व सीएनजीमध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. महागाईने पिचलेल्या जनतेला इंधन दरवाढ करून मोदी सरकारने महागाईच्या खाईत लोटले आहे. भाजपा सरकारने केलेल्या या महागाई विरोधात प्रदेश काँग्रेसचे अध्य हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली दादर येथील इंडिया बुल्स समोर आंदोलन केले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी रास्ता रोको करून लोकांना मेलोडी चॅाकलेट वाटप केले तसेच नरेंद्र मोदी सरकार व फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पेट्रोल नाही, डिझेल नाही, सिलेंडर गायब आहे, इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, शेतमालाला भाव नाही, जनता हवालदिल आहे पण भाजपा सरकार मात्र मस्तीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी पनौती आहेत, ते सत्तेत आल्यापासून देशातील जनतेवर वरंवडा फिरवत आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धादांत खोटे बोलत आहेत. पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा आहे असे जर त्यांना वाटत असेल तर जनता भर दुपारी कडक उन्हात पेट्रोल पंपावर काय ऊन खायला रांगा लावत आहेत का, कोणी साठेबाजी केली असे त्यांना वाटत असेल तर कारवाई केली पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.



