वालोपेतील अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक
महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक : सुरक्षाविषयक कामांची मागणी

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील क्षेपणातील वालोपे येथे झालेल्या दुचाकी व कंटेनर अपघातात चार वर्षीय चिमुकलीसह तिच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर पालखीतील ग्रामस्थांनी आज महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक देत विविध सुरक्षाविषयक कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.
मौजे वालोपे गावातील वरचीवाडी येथील भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंना संरक्षण भिंती उभाराव्यात, सर्विस रोड तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांना डांबरी अॅप्रोच द्यावा, योग्य ठिकाणी गतिरोधक बसवावेत, रेल्वे स्टेशन रोडवरील सब-वे मध्ये प्रकाश व्यवस्था करावी, तसेच सब-वे मध्ये पार्किंग करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय गणेशवाडी येथे संदीप मोरे यांच्या घराजवळ संरक्षण भिंत उभारणे, दिशादर्शक फलक बसविणे तसेच महामार्गालगतच्या वस्तीजवळ सुरक्षिततेसाठी रेलिंग उभारण्यात यावे, अशीही मागणी ग्रामस्थांनी महामार्ग विभागाकडे केली.
यावेळी अशोक आयरे, दीपेश आयरे, रवींद्र तांबिटकर, विकास गुरव, प्रतीक सुर्वे, राजेंद्र सोलकर आणि निलेश कदम उपस्थित होते.



