मुख्य बातमी

रत्नागिरीत माथाडी कामगार आक्रमक; दोन दिवसांचे धरणे आंदोलन

रत्नागिरी : शासकीय धान्य गोदामांमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या माथाडी कामगारांच्या रोजगारावर गदा आणणाऱ्या शासन निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलनाची ठिणगी पडली असून रत्नागिरी जिल्ह्यातही माथाडी कामगार आक्रमक झाले आहेत. वाहतूकदारांच्या अ-नोंदणीकृत खासगी कामगारांकडून धान्य भराई-उतराईची कामे करून घेण्याच्या निर्णयाचा निषेध करत भारतीय माथाडी सुरक्षा रक्षक श्रमजीवी आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

शासनमान्य धान्य गोदामांमध्ये धान्य उतरविणे, भरणे, मोजमाप करणे तसेच रास्तभाव दुकानांपर्यंत धान्य पोहोचविण्याची कामे वर्षानुवर्षे माथाडी कामगारांमार्फत केली जात आहेत. मात्र शासनाने आता धान्य थेट दुकानदारांच्या ठिकाणी उतरविण्याचा निर्णय घेतल्याने ही कामे वाहतूकदारांच्या माध्यमातून खासगी कामगारांकडून करून घेतली जाणार आहेत. या निर्णयामुळे माथाडी कामगारांच्या हातातील रोजगार हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली असून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे १५० माथाडी कामगार शासकीय धान्य गोदामांमध्ये कार्यरत आहेत. नवीन धोरणामुळे हे सर्व कामगार बेरोजगार होण्याच्या उंबरठ्यावर आले असून शासनाने तात्काळ निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच मजुरी व लेवीची रक्कम संबंधित कंत्राटदारांकडून माथाडी मंडळाकडे वेळेत जमा केली जात नसल्याने आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आरोपही संघटनेकडून करण्यात आला.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात प्रशांत पालकर, अशोक सूर्यवंशी, संतोष घडशी यांच्यासह सुमारे 150 संख्येने माथाडी कामगार सहभागी झाले आहेत. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास २७ मेपासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाला प्रशासनाला यासंदरभात निवेदन देत माथाडी कामगारांच्या समस्या मांडण्यात आल्या आहेत. संबंधित मागण्या शासनस्तरावरील असल्याने आंदोलकांचे निवेदन तात्काळ शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!