मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

मुरडे गोठलवाडी (खेड) येथे गावठी बॉम्बचा स्फोट; १२ वर्षीय मुलगा जखमी

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे गावठी बॉम्बचा स्फोट होऊन १२ वर्षांचा मुलगा जखमी झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रणव सुरेश येसरे (वय १२) असे जखमी मुलाचे नाव आहे. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जंगल परिसरात शिकारीसाठी गावठी बॉम्ब ठेवण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळी अचानक मोठा स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून परिसरात शोधमोहीम सुरू केली असून श्वान पथकाच्या सहाय्यानेही तपास करण्यात येत आहे. तसेच गावातील नागरिकांची चौकशी सुरू असून हा स्फोट नेमका कशामुळे झाला आणि गावठी बॉम्ब कुणी ठेवला होता याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या घटनेमुळे मुरडे गोठलवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपासानंतर स्फोटामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!