हर्णै (दापोली) येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी

दापोली : तालुक्यातील हर्णै येथील ऐतिहासिक भुईकोट गोवा किल्ला परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या किरकोळ वादानंतर दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली असून, यामुळे परिसरात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भुईकोट गोवा किल्ला परिसरात बाजारपेठ मोहल्ल्यातील काही युवक धूम्रपान व मद्यपान करत असल्याच्या संशयावरून दोन गटांमध्ये वाद सुरू झाला होता. हा वाद पुढे दोन समाजांतील युवकांमधील संघर्षात परिवर्तित झाल्याचे सांगण्यात येत असून, याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी हर्णे परिसरात जोरदार रास्ता रोको आंदोलन केले.
हा मुख्य वाद मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडला होता. कनकदुर्ग शेजारील भुईकोट गोवा किल्ला परिसरात काही युवक मद्यप्राशन आणि धूम्रपान करत असल्याचे पाहून स्थानिक तरुण चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर यांनी त्यांना हटकले व तिथे असे कृत्य करण्यास कडक विरोध केला होता. मात्र, याच घटनेचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी, बुधवारी संध्याकाळी २५ ते ३० युवकांच्या एका मोठ्या समूहाने चिन्मय आणि महेंद्र यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला. या टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत चिन्मय गुरव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना फ्रॅक्चर झाले आहे, तर महेंद्र रघुवीर हे देखील गंभीर जखमी झाले असून दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्राणघातक हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच हर्णै आणि दापोली परिसरात हिंदू बांधव आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. “सर्व हल्लेखोरांना तात्काळ अटक झाल्याशिवाय मागे हटणार नाही,” अशी आक्रमक भूमिका घेत नागरिकांनी रस्ते अडवून धरले. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे दापोली परिसरात कमालीची संवेदनशीलता निर्माण झाली आहे. घटनेची गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने पावले उचलत मारहाण करणाऱ्या काही संशयित युवकांना ताब्यात घेतले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी संपूर्ण हर्णै व दापोली परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयम व शांतता राखावी, असे आवाहन पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
