महाराष्ट्रमुख्य बातमी

५२ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा 

सोलापुरात आजपासून रंगणार महाराष्ट्राच्या खो-खोचा महासंग्राम!

सोलापूर : महाराष्ट्रातील युवा खो-खोपटूंच्या कौशल्याची खरी कसोटी ठरणारी ५२ वी कुमार-मुली (१८ वर्षाखालील) महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा आजपासून सोलापुरात दिमाखात सुरू होत आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि सोलापूर ॲमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने किरण स्पोर्ट्स, सोलापूर यांच्या विद्यमाने आयोजित ही स्पर्धा २ ते ५ जून २०२६ या कालावधीत शासकीय मैदान, नेहरूनगर, विजापूर रोड, सोलापूर येथे रंगणार आहे.

राज्यातील २४ जिल्ह्यांतील कुमार व मुलींचे संघ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होत असल्याने सोलापूर शहरात खो-खोचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. राज्यातील अव्वल खेळाडूंमधील चुरशीच्या लढती पाहण्याची संधी खो-खोप्रेमींना मिळणार असून हा कौशल्य, वेग आणि रणनीतीचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी चार स्वतंत्र मैदाने तयार करण्यात आली आहेत. यासोबतच प्रेक्षकांसाठी भव्य गॅलरीची उभारणी करण्यात आल्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या क्रीडारसिकांना सामने जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे. राज्यातील मातब्बर संघ मैदानात उतरल्याने खो-खोच्या वेगवान आणि रोमांचकारी खेळाची धुमश्चक्री रंगणार असल्याचे चित्र आहे.

या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून याच स्पर्धेतून महाराष्ट्राचा कुमार व मुलींचा संघ निवडला जाणार आहे. निवड झालेला संघ उत्तराखंड येथे होणाऱ्या ४५ व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू राष्ट्रीय संघातील स्थानासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.

राष्ट्रीय संघ निवडीच्या दृष्टीने नियुक्त करण्यात आलेल्या निवड समितीतील श्रीरंग बनसोडे (सोलापूर), विशाल पाटील (जळगाव), यतीन आक्रे (पालघर) व नंदिनी धुमाळ (मुंबई) यांची संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या कामगिरीवर करडी नजर असणार आहे. त्यामुळे प्रत्येक सामना आणि प्रत्येक गुण खेळाडूंसाठी निर्णायक ठरणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्यभरातील संलग्न जिल्हा संघटनांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभत आहे असे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी सांगितले की, राज्यातील युवा खेळाडूंच्या सहभागामुळे सोलापुरात पुढील चार दिवस खो-खोचा उत्साहपूर्ण जल्लोष अनुभवायला मिळणार आहे.

५ जूनला विशेष सर्वसाधारण सभा

स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी म्हणजे ५ जून रोजी सकाळी ११:३० वाजता हॉटेल सिटी पार्क, सोलापूर येथे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील संलग्न जिल्हा संघटनांचे अधिकृत प्रतिनिधी या सभेला उपस्थित राहणार असून खो-खोच्या विकासासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.

कुमार गटवारी :

अ गट : धाराशिव, छ. संभाजीनगर, नंदुरबार; ब गट : सोलापूर, धूळे, परभणी

क गट : सांगली, जालना, लातूर; ड गट : पुणे, पालघर, नांदेड; इ गट : सातारा, रत्नागिरी, हिंगोली; फ गट : मुंबई उपनगर, नाशिक, रायगड; ग गट : ठाणे, बीड, सिंधुदुर्ग; ह गट : मुंबई, अहिल्यानगर, जळगाव

मुली गटवारी

अ गट : सांगली, नंदुरबार, जळगाव; ब गट : ठाणे, परभणी, लातूर; क गट : धाराशिव, मुंबई उपनगर, छ. संभाजीनगर; ड गट : सोलापूर, पालघर, बीड; इ गट : नाशिक, अहिल्यानगर, सिंधुदुर्ग; फ गट : पुणे, जालना, नांदेड; ग गट : सातारा, मुंबई, हिंगोली; ह गट : रत्नागिरी, धूळे, रायगड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!