ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपट संगीतातील सुवर्णकाळाचा एक तारा निखळला आहे. ज्येष्ठ आणि लोकप्रिय गायिका सुमन कल्याणपूर (वय ८९) यांचे काल (३१ मे) रोजी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
२८ जानेवारी १९३७ रोजी भवानीपूर (सध्याचा बांगलादेश) येथे जन्मलेल्या सुमनताईंचे माहेरचे नाव सुमन हेमाडी होते. संगीताचा वारसा त्यांना घरातूनच लाभला होता. वडील शंकरराव हेमाडी आणि आई सिताबाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या. लग्नापूर्वीच त्यांनी आपल्या गायकीने रसिकांची मने जिंकायला सुरुवात केली होती.
मराठी भावगीत, गझल, ठुमरी आणि भक्तिगीते हे सुमनताईंचे खास आवडीचे गायन प्रकार होते. त्यांनी केवळ मराठीच नव्हे,तर हिंदी, गुजराती आणि बंगाली अशा अनेक भारतीय भाषांमध्ये हजारो अजरामर गाणी गायली आहेत.त्यांच्या मखमली आवाजात गायलेली गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत.मोहम्मद रफी,मन्ना डे,तलत महमूद आणि हेमंतकुमार अशा दिग्गज गायकांसोबत त्यांनी गायलेली युगलगीते आजही तितकीच लोकप्रिय आहेत.
त्यांची काही गाजलेली मराठी गाणी
रिमझिम झरते श्रावण धारा, शब्द शब्द जपून ठेव, ओमकार प्रधान रूप गणेशाचे, केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर, आईसारखे दैवत सार्या जगतात नाही, अरे संसार संसार.
सुमन कल्याणपूर यांच्या संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाची दखल घेऊन त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार आणि नुकताच मिळालेला पुलस्मृती पुरस्कार यांसारख्या अनेक सन्मानांनी त्यांच्या कारकिर्दीवर शिक्कामोर्तब झाले होते.



