मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापूर रोड रेल्वे स्थानकातील प्रतीक्षालयाचे सिलिंग कोसळले

राजापूर : कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर रोड रेल्वे स्थानकातील प्रवासी प्रतीक्षालयाचे सिलिंग मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने त्याचवेळी मुंबईकडे जाणारी कोकणकन्या एक्सप्रेस स्थानकात येणार असल्याने प्रतीक्षालयात थांबलेले सर्व प्रवासी प्लॅटफॉर्मवर गेले होते. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. अन्यथा सिलिंगखाली प्रवासी अडकून गंभीर घटना घडण्याची शक्यता होती. या घटनेनंतर स्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, कोसळलेल्या सिलिंगखाली कोणी अडकले नाही ना, याची तातडीने खातरजमा करण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे स्थानकावरील बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राजापूर विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच कोसळलेल्या सिलिंगच्या दुरुस्तीसाठी संबंधित यंत्रणेला तात्काळ कामाला लावण्यात आले. मात्र गेल्या दोन वर्षांत दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडल्याने स्थानकावरील विकासकामांच्या दर्जाबाबत प्रवासी व नागरिकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी शासनाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राजापूर रोड रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण व आधुनिकीकरण करण्यात आले होते. या कामांमुळे स्थानकाचा चेहरामोहरा बदलला असला, तरी काम सुरू असतानाच एकदा छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली होती. त्यावेळीही बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

आता पुन्हा प्रतीक्षालयाचे सिलिंग कोसळल्याने त्या शंकांना अधिक बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या विकासकामांमध्ये अशी घटना घडल्याने कामाच्या दर्जाबरोबरच देखभाल व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लाखो रुपये खर्चून करण्यात आलेल्या विकासकामांची गुणवत्ता नेमकी कितपत सक्षम आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच स्थानक परिसरातील सर्व बांधकामांची तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी रेल्वे प्रवासी, नागरिक आणि स्थानिक स्तरातून करण्यात येत आहे. मोठी दुर्घटना थोडक्यात टळल्याने प्रशासनाने या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!