गुहागरच्या तरुणांचा थेट दिल्लीतील आंदोलनात सहभाग

गुहागर (संदेश कदम) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे “नीट” परीक्षा गैरव्यवहार, शिक्षण क्षेत्रातील विविध अनियमितता आणि तरुणांच्या बेरोजगारी विरोधात सध्या सुरू असलेल्या आंदोलनाला आता देशव्यापी स्वरूप प्राप्त झाले आहे. शिक्षण क्षेत्र सुधारावे आणि तरुणांना हक्काचा रोजगार मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून तरुण वर्ग या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. विशेष बाब म्हणजे, गुहागर तालुक्यातील काही तरुणही गेल्या दोन दिवसांपासूून दिल्लीत या आंदोलनात सक्रियपणे उतरले आहेत.
जंतर-मंतर येथील आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेले गुहागरचे प्रथमेश बारटक्के यांनी तिथल्या परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी बोलताना सुरुवातीला दिल्ली पोलिसांनी तरुणांवर केलेल्या लाठीचार्जचा जाहीर निषेध व्यक्त केला. तसेच “हे आंदोलन केवळ आमच्या स्वतःसाठी नसून, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीच्या शैक्षणिक आणि उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे,” अशी आग्रही भूमिका मांडली आहे. एवढेच नव्हे तर, प्रथमेश बारटक्के यांनी दिल्लीतून थेट गुहागरसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम तरुणांना या लढ्यात आणि आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जाहीर आवाहन देखील केले आहे.



