राजापुरात ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’ संकल्पनेचा शुभारंभ
आमदार किरण सामंत यांचा अनोखा उपक्रम : शाखाप्रमुखांना फणस कलमांचे वाटप

राजापूर : पर्यावरण संवर्धन आणि कृषी समृद्धीचा संदेश देत आमदार किरण सामंत यांच्या संकल्पनेतून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळवडे येथील प्रभावती हॉलमध्ये तळवडे जिल्हा परिषद गटातील शिवसेना शाखाप्रमुखांना फणस कलमांचे वाटप करण्यात आले. ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’ या संकल्पनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
या कार्यक्रमात प्रत्येक शाखाप्रमुखाला फळशेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रत्येकी पाच फणसाची कलमे देण्यात आली. मतदारसंघात केवळ राजकीय आणि सामाजिक कार्याचा विस्तार न करता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आमदार किरणभैया सामंत यांनी हे कौतुकास्पद पाऊल उचलल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक नागले यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते ॲड. साईराज कोलते म्हणाले, “केवळ घोषणा करून पर्यावरणाचे संरक्षण होणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे. शाखाप्रमुख हे तळागाळातील जनतेशी जोडलेले असतात. त्यांनी स्वतःच्या अंगणात किंवा शेतात ही झाडे लावून फळशेतीची सुरुवात केल्यास संपूर्ण गावासाठी तो एक आदर्श ठरेल.”
केवळ राजकीय कार्यक्रमांपुरता मर्यादित न राहता निसर्ग आणि शेतीशी थेट नाळ जोडणारा हा उपक्रम मतदारसंघाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी तालुका प्रमुख दीपक नागले, जिल्हा परिषद सदस्या सिद्धांली मोरे, पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासये, समिक्षा वाफेलकर, पाचल विभाग संघटक आत्माराम सुतार, ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पा साळवी, पाचलचे सरपंच बाबा लाल फरास, विभाग प्रमुख अमर जाधव, शैलेश साळवी, युवासेना तालुका प्रमुख सुनील गुरव, युवासेना विभाग प्रमुख युवराज मोरे, उपविभाग प्रमुख उदय राणे, रवींद्र सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.



