मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

रस्ते रुंदीकरणात तोडलेल्या झाडांच्या बदल्यात वृक्षलागवडीची मागणी

लांजातील जागरूक नागरिकांचे सार्वजनिक बांधकाम व वन विभागाला निवेदन

लांजा : रस्ते रुंदीकरणाच्या कामांदरम्यान तोडलेल्या झाडांच्या बदल्यात पर्यायी वृक्षलागवड करण्यात यावी तसेच झालेल्या वृक्षतोडीची संपूर्ण माहिती नागरिकांसमोर ठेवावी, या मागणीसाठी लांजातील जागरूक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाकडे निवेदन सादर केले आहे.

गेल्या काही वर्षांत लांजा तालुक्यात विविध रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली. या कामांमुळे अनेक ठिकाणी शेकडो झाडांची तोड करण्यात आली. मात्र, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक असलेली पर्यायी वृक्षलागवड अद्यापही करण्यात आलेली नसल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे परिसरातील हरित पट्टा कमी होत असून पर्यावरणावर त्याचे विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदनात लांजा-कुर्णे, लांजा-दाभोळे, लांजा-जावडे, लांजा-साटवली या मार्गांसह मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पूल ते वाकेड या दरम्यान मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व मार्गांवर नेमकी किती झाडे तोडण्यात आली याची अधिकृत माहिती चार दिवसांच्या आत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच येत्या पावसाळ्यात आंबा, फणस, जांभूळ, वड, पिंपळ यांसारख्या स्थानिक व पर्यावरणपूरक वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करून हरित पट्टा पुनर्स्थापित करावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संबंधित विभागांनी या बाबतीत तातडीने कार्यवाही करावी, असेही नागरिकांनी म्हटले आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. चव्हाण यांनी नागरिकांच्या निवेदनाची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. येत्या पावसाळ्यात आवश्यक त्या ठिकाणी वृक्षलागवड करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

मात्र, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही जागरूक नागरिकांनी दिला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. निवेदन देतेवेळी मोहन तोडकरी, सचिन लिंगायत, बाबा धावणे, अभिजीत राजेशिर्के, मंगेश आंबेकर, सागर वायंगणकर, अभिजित वाघदरे, राजेंद्र सुर्वे, सुरेश दाभोळकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!