“निष्ठा विकत घेता येत नाही; शिवसैनिकांचा विश्वासघात करणाऱ्यांनी निष्ठेवर भाष्य करू नये!” : रवींद्र डोळस

रत्नागिरी : बाळ माने यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आणि त्यानंतर केलेल्या विधानांमुळे आम्हा शिवसैनिकांना प्रतिक्रिया देणे भाग पडले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द हा प्रत्येक शिवसैनिकासाठी अंतिम असतो. त्यामुळे आजवर आम्ही संयम बाळगला, मौन पाळले. मात्र त्या संयमाचा अर्थ कमकुवतपणा समजण्याची चूक कोणी करू नये.
स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी पक्ष बदलणाऱ्यांनी निष्ठेवर भाष्य करणे हा मोठा विरोधाभास आहे. शिवसेनेत येताना आणि शिवसेनेतून जाताना कोणत्या भूमिकेत आलात आणि कोणत्या भूमिकेत निघून गेलात, याचा हिशेब जनतेलाही माहीत आहे आणि शिवसैनिकांनाही माहीत आहे.
आज ज्येष्ठ शिवसेना नेते विनायक राऊत यांच्यावर टीका केली जात आहे. पण राऊत यांनी आयुष्यभर एकच नेता, एकच विचार, एकच पक्ष आणि एकच भगवा झेंडा यांच्याशी निष्ठा ठेवली आहे. जन्मापासून आजपर्यंत त्यांनी विचारांशी आणि संघटनेशी प्रामाणिक राहण्याची परंपरा जपली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी टीका करणाऱ्यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासाचे आत्मपरीक्षण करावे.
गेल्या काही दिवसांपासून स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या कृतीवरील प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी सातत्याने आरोपांची मालिका सुरू आहे. पण आरोप करून सत्य बदलत नसते. सत्य एवढेच आहे की पक्षाने विश्वासाने दिलेली उमेदवारी शेवटच्या क्षणाला कोणालाही विश्वासात न घेता परस्पर मागे घेतल्याने समस्त शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
शिवसेनेत येऊन अवघे २० महिने झाले असताना निष्ठा, त्याग आणि संघर्षाचे धडे देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या वीस महिन्यांचा संपूर्ण राजकीय लेखाजोखा शिवसैनिकांकडे आहे. त्यामुळे आम्हाला अधिक बोलण्यास भाग पाडू नये. कारण सत्य बाहेर आले तर अनेक मुखवटे गळून पडतील.
पराभवाच्या भीतीने माघार घेणारा शिवसैनिक असू शकत नाही. निवडणूक जिंकणे-हारणे हा लोकशाहीचा भाग आहे पण लढाई सुरू होण्यापूर्वीच रणांगण सोडणे ही शिवसेनेची परंपरा नाही. जर निवडणूक लढवण्याची तयारी नव्हती, तर पक्षात असंख्य निष्ठावंत शिवसैनिक तयार होते. एकदा सांगितले असते, तर आम्ही भगवा झेंडा घेऊन मैदानात उतरायला तयार होतो.
उमेदवारी अर्ज भरताना शिवसैनिकांची आठवण झाली, त्यांच्याकडून सहकार्य घेतले गेले पण अर्ज मागे घेताना एकाही शिवसैनिकाला विश्वासात घेण्याची गरज वाटली नाही. हा निर्णय घेताना पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार यांचा विचार झाला का, हा प्रश्न आज प्रत्येक शिवसैनिक विचारत आहे.
ज्या दिवशी अर्ज मागे घेण्यात आला, त्या दिवशी तुमच्या बाजूला एकही शिवसैनिक दिसला नाही. कारण निष्ठा आणि व्यवहार यामधील फरक शिवसैनिक ओळखतात. पद मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज असते पण निर्णय घेताना त्यांनाच अंधारात ठेवणे हा शिवसेनेचा संस्कार नाही.
आम्हाला वाद वाढवायचा नाही. ज्या घरात, ज्या पक्षात आणि ज्या विचारात तुम्ही जाण्याचा निर्णय घेतला आहे, तिथे सुखाने राहा. मात्र शिवसेनेवर, शिवसैनिकांवर आणि आयुष्यभर निष्ठा जपणाऱ्या नेत्यांवर टीका करताना मर्यादा पाळाव्यात. कारण निष्ठेची परंपरा जपणारे शिवसैनिक शांत असतात, पण गरज पडल्यास सत्य जनतेसमोर मांडण्याची ताकदही त्यांच्यात असते.
– रवींद्र डोळस
उप जिल्हाप्रमुख तथा जिल्हा समन्वयक, रत्नागिरी दक्षिण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)



