लांजा नगरपंचायतीची प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; १९ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

लांजा : लांजा नगरपंचायतीने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात धडक मोहीम राबवून विविध व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई केली. या मोहिमेत सुमारे १९ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एकूण २ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
नगरपंचायतीच्या पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठ, आठवडा बाजार, रस्त्यावरील विक्रेते, भाजीपाला विक्रेते, फुलविक्रेते तसेच हॉटेल व्यावसायिकांची तपासणी केली. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर होत असल्याचे आढळून आल्याने संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली.
एकल वापराच्या (सिंगल यूज) प्लास्टिकमुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचत असल्याने शासनाने त्यावर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीकडून जनजागृतीबरोबरच दंडात्मक कारवाईवर भर दिला जात आहे. व्यापारी व नागरिकांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करून प्लास्टिकमुक्त शहर घडविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.
या मोहिमेत नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक सुरज जाधव, शहर समन्वयक रोहित कराळे, वरिष्ठ लिपिक प्रज्ञा जेधे, प्रमोद जाधव, लिपिक संजय गुरव, संतोष आग्रे, व्हॉलमन रंजना खेडेकर, डाटा ऑपरेटर युवराज मांडवकर, विनीत आंबेकर, शिल्पा लांजेकर, मुकादम रवींद्र कांबळे, शिपाई राजकुमार कुंभार तसेच सफाई कर्मचारी राजेश कुंभार, बाबल्या पवार आदींनी सक्रिय सहभाग घेतला.
नगरपंचायतीकडून भविष्यातही अशा प्रकारच्या धडक मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असून प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.



