‘आरटीओ’च्या वायुवेग पथकाची धडक कारवाई; वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
ओव्हरलोड वाहनांवर सर्वाधिक कारवाई; १ कोटी १३ लाखांचा दंड, वर्षभरात ५,८१४ दोषी वाहनांवर आरटीओचा बडगा

रत्नागिरी : जिल्ह्यातील अपघातांना आळा घालणे आणि वाहतुकीला शिस्त लावण्याच्या हेतूने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वायुवेग पथकाने वर्षभरात धडक कारवाई केली आहे. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या आर्थिक वर्षात या पथकाने एकूण ५,८१४ दोषी वाहनांवर कायदेशीर कारवाई करत ३ कोटी ३३ लक्ष ४३ हजार रुपये दंड आणि १८.४४ लाख रुपये कर असा एकूण कोट्यवधी रुपयांचा महसूल वसूल केला आहे.
सद्यस्थितीत रत्नागिरी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामध्ये ५ सर्वसाधारण इंटरसेप्टर वाहने आणि १ अत्याधुनिक रडार यंत्रणेने सुसज्ज असे इंटरसेप्टर वाहन कार्यरत आहे. ही वाहने स्पीडगन, ब्रेथ अॅनालायझर (मद्यप्राशन तपासणी यंत्र) व इतर आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून, त्यांच्या माध्यमातून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर थेट व अचूक कारवाई केली जात आहे. या संपूर्ण मोहिमेत सर्वाधिक दंडवसुली ही नियमबाह्य माल वाहतूक करणारे ट्रक, टिप्पर आणि ट्रेलर आदी वाहनांकडून करण्यात आली आहे. नियमापेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या (ओव्हरलोड) ३५५ वाहनांवर कारवाई करून पथकाने १ कोटी १३ लक्ष ५९ हजार रुपयांचा घसघशीत दंड वसूल केला आहे.
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरही आरटीओने कडक पावले उचलली आहेत. ४२५ प्रवासी बस आणि ७२ खासगी वाहनांवर कारवाई करून २६.८८ लाख रुपये दंड व २२.७२ लाख रुपये कर वसूल करण्यात आला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ७७ रिक्षांकडून ३ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल झाला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या ५५ दोषी स्कूलबसवर कारवाई करून ३ लाख ८१ हजार रुपये दंड आणि १२ हजार रुपये कर वसूल करण्यात आला.
वाहतुकीच्या विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर वायुवेग पथकाने नोंदवलेले गुन्हे आणि वाहनांची संख्या अशी : विना हेल्मेट दुचाकी चालक -१४३०, ओव्हरस्पीड (वेग मर्यादा ओलांडणे) १३२२, पीयुसी (PUC) नसलेली वाहने – १२८०, योग्यतेचे प्रमाणपत्र (Fitness) संपलेली वाहने- ११७६, विना विमा प्रमाणपत्र (Insurance) धावणारी वाहने- १०९७, विना अनुज्ञप्ती (Driving License) वाहन चालवणे- ६०४, रिफ्लेक्टरशिवाय धावणारी वाहने- ४९४, गाडी चालवताना मोबाईलचा वापर- २३८, विना सीटबेल्ट वाहन चालवणे- २१५, ट्रिपल सीट दुचाकी चालक ६३, वाहनामध्ये विनापरवानगी बदल करणे (Modifications)- ४८.
तपासणी मोहीम तीव्र राहणार
रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करणे आणि महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षित व शिस्तबद्ध करणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ही तपासणी मोहीम यापुढेही अशीच सातत्याने आणि अधिक तीव्रतेने चालू राहणार आहे. त्यामुळे सर्व वाहनधारक, वाहतूकदार आणि चालकांनी वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.



