मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

लांजा तालुक्यात २६ ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन

लांजा : गेल्या तीन वर्षांत मुदत संपलेल्या अथवा मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये सदस्य पदांच्या आरक्षण निश्चितीसाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभांमध्ये प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मुंबई ग्रामपंचायत नियम, १९६६ मधील सुधारित तरतुदींनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीतील प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया विशेष ग्रामसभांद्वारे पार पाडण्यात येणार आहे.

या अनुषंगाने १२ जून रोजी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. बेनीखुर्द, जावडे, पालू, वाघणगाव, आंजणारी, माजळ, वनगुळे, आसगे, विवली, कणगवली, साटवली, भांबेड, पन्हळे, इंदवटी, कोल्हेवाडी, खोरनिनको, गोळवशी, मठ, शिपोशी आणि कुरंग या ग्रामपंचायतींमध्ये सकाळी १० वाजता ग्रामसभा होणार आहे, तर रावारी, वाडगाव, इसवली, विलवडे, आडवली आणि हर्दखळे या ग्रामपंचायतींमध्ये दुपारी ३ वाजता विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.

या ग्रामसभांमध्ये सदस्य पदांसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असून त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींची निवडणूक समीकरणे अधिक स्पष्ट होणार आहेत. १२ जून रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभा तालुक्यातील राजकीय घडामोडींना दिशा देणाऱ्या ठरणार आहेत. निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठीही या सोडतीनंतर पुढील रणनीती निश्चित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार, स्थानिक राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!