बाळ माने यांची निवडणुकीतून माघार
विधान परिषदेवर अनिकेत तटकरेंच्या बिनविरोध निवडीची शक्यता

रत्नागिरी : कोकण विधान परिषद निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. उबाठा गटाचे उमेदवार सुरेंद्र तथा बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
उमेदवार बाळ माने म्हणाले की, निवडणुकीचा घोडेबाजार आणि मतदारांची आकडेवारी पाहता महाविकास आघाडीला यश मिळणे दूर वाटते. त्यामुळेच आपण उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अनिकेत सुनील तटकरे बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या संपूर्ण घडामोडीत मंत्री नितेश राणे यांनी महत्त्वाची मध्यस्थी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या हस्तक्षेपानंतरच बाळ माने यांनी माघारीचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
बाळ माने यांच्या माघारीमुळे रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणुकीचे चित्र मोठ्या प्रमाणात बदलले असून, कोकणातील राजकीय समीकरणांनाही नवी दिशा मिळाल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे आगामी निवडणुकीतील वातावरण अधिकच तापले असून, विविध राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.



