कडवट भाजपा विचारांच्या कार्यकर्त्यांची फौज निर्माण करावी
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना : रत्नागिरीत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक गावात निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळेच आज आपल्याला एवढी मोठी पदे मिळत आहे. भाजप पक्षाची सत्ता केंद्र सरकार पासून ते राज्य सरकारांपर्यंत आली आहे ती सत्ता फक्त आणि फक्त तळागाळात असणाऱ्या कडवट विचारांच्या कार्यकर्त्यामुळेच आली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या गावांमध्ये किमान पाच कडवट भाजपा विचारांच्या कार्यकर्त्यांची फौज निर्माण करावी, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. त्यावेळी ते व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी विधान परिषद आमदार प्रमोद जठार, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार विनय नातू, आमदार प्रशांत ठाकूर, राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, ॲड. वैभव खेडेकर, ॲड. दीपक पटवर्धन, माजी आमदार सूर्यकांत दळवी, रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष सूर्यकांत दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सहदेव बेटकर यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. त्याचप्रमाणे चिपळूण, खेड, मंडणगड, राजापूर, रत्नागिरी या भागातील असंख्य लोकांनी, माजी नगरसेवक, माजी ग्राम पंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण पुढे म्हणाले, “कोकणात बेरोजगारीची संकट मोठ्या प्रमाणावर आहे. इकडचे तरुण गाव सोडून मुंबईला जातात आणि त्याच्यामुळे गावे ओस पडली आहेत. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. आपल्या कोकणात अनेक मंदिरे आहेत, हिंदू धर्माची धार्मिक स्थळे आहेत. त्यामध्ये मार्लेश्वर, गणपतीपुळे, संगमेश्वर सूर्यमंदिर, कसबा येथील छ. संभाजी महाराजांचे स्मारक, राजापुरातील श्री धुतपापेश्वर मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. या ठिकाणी धार्मिक पर्यटन विकसित झाले तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल. त्यामुळे आपापल्या गावातील, तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी धार्मिक पर्यटन स्थळांचा आराखडा तयार करून आमच्यापर्यंत पाठवा आम्ही त्यासाठी प्रयत्न करू. ”
चौकट १
संधीसाधूंना मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत पक्षात स्थान नाही
रवींद्र चव्हाण म्हणाले की, “आपल्याला कडवट विचारांचा कार्यकर्ता निर्माण करायचा आहे. काही लोक मध्यंतरीच्या काळात संधी साधून महाविकास आघाडीचे सरकार येणार याचा अंदाज घेऊन महाविकास आघाडीत गेले. त्यांना पुन्हा भाजप पक्षात मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी बाळ माने यांचे नाव न घेता यावेळी दिला.



