चिपळूणमध्ये माजी सैनिकांसाठी ‘वेटर्नस आऊटरीच प्रोग्राम’ संपन्न
७०० हून अधिक माजी सैनिक आणि कुटुंबीयांची उपस्थिती

रत्नागिरी : ‘द बॉम्बे सॅपर्स’चे कर्नल कमांडंट यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण येथे माजी सैनिक, वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘वेटर्नस आऊटरीच प्रोग्राम’ (माजी सैनिक जनसंपर्क मोहीम) यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला ७०० हून अधिक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
माजी सैनिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी रेकॉर्ड ऑफिस BEG आणि सेंटर (खडकी), विविध आर्मी रेकॉर्ड ऑफिस, PAO (OR), ECHS, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, AWPO आणि इतर कल्याणकारी संस्थांद्वारे एकूण १७ स्टॉल्स उभारण्यात आले होते. या स्टॉल्सच्या माध्यमातून स्पर्श पोर्टल संबंधित कामे डिजिटल जीवन प्रमाणपत्र, पेन्शन विषयक बाबी, नोंदणी कायदेशीर मदत, आरोग्य सेवा आणि तक्रार निवारण यांसारख्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘बॉम्बे सॅपर्स असोसिएशन’चे मानद सचिव लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनीस, PVSM, VSM, ADC (निवृत्त) होते. त्यांनी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी भारतीय लष्कर सदैव कटिबद्ध असल्याचे आवर्जून सांगितले. याप्रसंगी एअर मार्शल हेमंत नारायण भागवत, PVSM, AVSM, VM (निवृत्त) आणि BEG व सेंटर (खडकी) चे कमांडंट ब्रिगेडियर परमजीत सिंग ज्योती, SM, VSM हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा आणि योगदानाचा आदर राखत, कार्यक्रमात १७ वीर नारी आणि वीर मातांचा विशेष सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्हासह प्रत्येकी १० हजार रुपये रोख पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमादरम्यान एकूण ६०४ तक्रारी प्राप्त झाल्या, ज्यापैकी ४९२ तक्रारींचे जागीच निवारण करण्यात आले. उर्वरित प्रकरणांवर पुढील कारवाईसाठी नोंद घेण्यात आली आहे. उपस्थित वैद्यकीय पथकाद्वारे २७१ माजी सैनिक आणि त्यांच्या आश्रितांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार पुरवण्यात आले.
“या आऊटरीच प्रोग्राममुळे माजी सैनिकांना त्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी ‘सिंगल-विंडो’ (एक खिडकी) प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला. माजी सैनिक बांधवांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. या यशस्वी आयोजनातून भारतीय लष्कराचे आपल्या माजी सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणाप्रती असलेले सातत्यपूर्ण कर्तव्य अधोरेखित झाले.



