कुर्ला येथील भूस्खलन दुर्घटना; मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याकडून बचावकार्याची पाहणी
दगावलेल्या व्यक्तींच्या वारसाला ४ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर

मुंबई : कुर्ला (पश्चिम) येथील अशोक नगर, टेकडी क्रमांक ३ येथे आज (१२ ऑगस्ट २०२६) पहाटेच्या सुमारास भूस्खलन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत डोंगरउतारावरील माती आणि ढिगाऱ्याचा काही भाग २ ते ३ घरांवर कोसळल्याने जीवित आणि वित्तीय हानी झाली आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, पीडित कुटुंबांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व यंत्रणांना मदत कार्य अधिक वेगाने व योग्य समन्वय राखून पार पाडण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी प्रभाग समिती अध्यक्ष विजयेंद्र शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, एल विभागाचे सहायक आयुक्त (प्रभारी) अनिल जाधव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वारसाला ४ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत तर जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी ५० हजार रुपयांची वैद्यकीय मदत देण्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली आहे.
दुर्घटना घडली ती जागा आणि तेथे पोहोचण्याचा मार्ग हा फक्त एक व्यक्ती जावू शकेल, इतका अरुंद आहे. घटनास्थळी उपस्थित बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, कामगार, मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (NDRF), मुंबई पोलिस, १०८ रुग्णवाहिका आणि इतर सर्व यंत्रणा ह्या घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत दोन शव काढण्यात आले आहेत. तर दोन जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य आणि संपूर्ण परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.

