करंबेळे तर्फे देवळे शाळेच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत डंका

संगमेश्वर : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळा करंबेळे तर्फे देवळे येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
अतिदुर्गम भागात असलेल्या या शाळेतील विद्यार्थी दररोज सुमारे तीन ते चार किलोमीटर जंगलातून पायी प्रवास करून शाळेत येतात. कोणत्याही प्रकारच्या विशेष सुविधा किंवा मोठ्या साधनसामग्रीचा आधार नसतानाही शिक्षकांनी दिलेले ज्ञान आत्मसात करत विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर हे उल्लेखनीय यश मिळवले आहे.
श्री अशोक धावडे याने इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत १०८ वा, तर तालुका गुणवत्ता यादीत १८ वा क्रमांक मिळवण्याचा बहुमान मिळवला. त्याला वर्गशिक्षक संदीप सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच दुर्वा अशोक धावडे हिने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत ३७ वा तर तालुका गुणवत्ता यादीत ७ वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. तिला मार्गदर्शक वर्गशिक्षक तथा माजी मुख्याध्यापक बाबासाहेब पाटील तसेच सौ. शुभांगी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशामध्ये त्यांचे आई-वडील अर्पिता व अशोक धावडे तसेच बहीण तन्वी यांचेही मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. विशेष म्हणजे, सलग दोन वर्षे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्याचा, तसेच शासनाने सुरू केलेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या पहिल्याच वर्षी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्याचा बहुमान या शाळेला विद्यार्थ्यांच्या यशामुळे प्राप्त झाला आहे.
या यशामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत धावडे, उपाध्यक्ष सौ. मधुरा धावडे, शिक्षणतज्ञ महेश धावडे, प्रवीण धावडे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि पालक यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
अतिदुर्गम भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या दुहेरी यशाबद्दल त्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे, पालकांचे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावातून, पंचक्रोशीतून तसेच संगमेश्वर तालुक्यातून या यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



