महाराष्ट्रमुख्य बातमी

राज्यात मान्सूनने वेग पकडला; मान्सूनची दमदार आगेकुच; बळीराजा सुखावला

मुंबई : राज्यात १४ दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा वेग पकडला आहे. आज कोकणातील रत्नागिरी जिल्हा ओलांडून रायगड जिल्ह्याच्या अलिबागपर्यंत तर मध्य महाराष्ट्रात सातारा, सोलापूर जिल्हे ओलांडून पुणे जिल्ह्यात मावळ, मुळशी पुणेपर्यंत तसेच दक्षिण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा कर्जत जामखेडपर्यंत आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्याचा बराचसा भाग व्यापत मान्सूनने पुढे वाटचाल केली.

त्याचबरोबर मान्सूनच्या अरबी समुद्रीय शाखेनेच तेलंगणा राज्यातून मान्सून दक्षिण विदर्भातील गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्याच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊन ठेपला आहे. मान्सून पोहोचलेल्या वरील सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली नसली तरी मान्सूनचे वारे तेथपर्यंत पोहोचले आहेत. मान्सूनच्या पुढील आगमनासाठी वातावरण अनुकूल असुन येत्या २-३ दिवसात मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून पुढे झेपावेल, असे वाटते

पावसाळी हंगामात समुद्रसपाटीच्या पातळीत स्थिरावणारा हवेच्या कमी दाबाचा पुर्वो-पश्चिम आस काहीसा दक्षिणेकडे सरकला आहे. आज तो पंजाब हरियाणा ऐवजी राजस्थान बिहार उत्तरप्रदेश राज्यातून पास होत आहे. तसेच वायव्येकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याचा जोर कमी झाला आहे. अरबी समुद्रात साडे तीन ते पावणेचार किमी. दरम्यान असणाऱ्या प्रत्यावर्ती वाऱ्याच्या प्रणाली विरळतेकडे गेली आहे. त्यामुळे मान्सूनी वाऱ्यांना बळकटी मिळाली असून महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल झाली आहे.

राज्याच्या विविध भागात आज पावसाचे हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह अनेक भागात आज पावसाने हजेरी लावली. जालना शहरासह आसपासच्या परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मागच्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!