चिपळूणमध्ये माजी सैनिक, वीरनारी व त्यांच्या कुटुंबांसाठी भव्य मेळावा उत्साहात
७०० हून अधिक जणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : कर्नल कमांडंट, द बॉम्बे सॅपर्स आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी चिपळूण येथे आयोजित केलेला ‘माजी सैनिक संपर्क व कल्याण मेळावा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यास रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांतून ७०० हून अधिक माजी सैनिक, वीरनारी व त्यांच्या कुटुंबीयांनी उत्स्फूर्त हजेरी लावली होती.
मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून बॉम्बे सॅपर्स असोसिएशनचे मानद सचिव लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनीस (निवृत्त) उपस्थित होते. त्यांनी माजी सैनिक आणि वीरनारींच्या राष्ट्रसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी एअर मार्शल हेमंत नारायण भागवत (निवृत्त), बीईजी अँड सेंटर खडकीचे कमांडंट ब्रिगेडियर परमजित सिंह ज्योती आदी मान्यवर उपस्थित होते. ब्रिगेडियर ज्योती यांनी ईसीएचएस (ECHS) अंतर्गत आरोग्य सेवा अधिक सुलभ करण्याच्या आणि माजी सैनिकांशी सातत्यपूर्ण संवाद राखण्याच्या लष्कराच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.
सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल दीपक टोंगे (निवृत्त) यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, आर्थिक सहाय्य, शैक्षणिक सुविधा आणि पुनर्वसनाच्या संधींबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
माजी सैनिकांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी मेळाव्यात रेकॉर्ड्स कार्यालय, ईसीएचएस, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक, जिल्हा कौशल्य विकास केंद्र यांसह एकूण १७ सेवा कक्ष उभारण्यात आले होते. याद्वारे स्पर्श (SPARSH), डिजिटल जीवन प्रमाणपत्र, निवृत्तीवेतन आणि कायदेशीर बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
मेळाव्यात प्राप्त झालेल्या एकूण ६०४ तक्रारींपैकी ४९२ तक्रारींचे जागीच निवारण करण्यात आले, तर उर्वरित तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागांकडे पाठवण्यात आल्या. तसेच २७१ माजी सैनिक व कुटुंबीयांची वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत १२७ जणांची तपासणी करून ४७ जणांना मोफत चष्मे वाटण्यात आले.
देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांच्या १८ वीरनारी व वीरमातांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सन्मानाचे प्रतीक म्हणून प्रत्येकीला १० हजार रुपये रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
लष्करी आणि शासकीय संस्थांच्या उत्तम समन्वयामुळे हा मेळावा माजी सैनिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून, अशा प्रकारचे मेळावे भविष्यातही नियमित आयोजित केले जावेत, अशी अपेक्षा उपस्थित माजी सैनिकांनी व्यक्त केली.



