मुख्य बातमी

देशातील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून भाट्ये प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचा सन्मान

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्राला सन २०२५-२६ वर्षाचा देशातील बागायती उपवन पिकामध्ये काम करणारे सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून कासारगोड केरळ येथे सन्मानित करण्यात आले.

या संशोधन केंद्रावर गेली ७१ वर्षे नारळ या पिकावर पीक सुधार, उत्पादन तंत्रज्ञान आणि पीक संरक्षण यावर संशोधन कार्य सुरू आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित उपवनपिके संशोधन प्रकल्प, कासारगोड याचे हे संशोधन केंद्र एक महत्त्वाचे केंद्र आहे. संशोधन केंद्रावर केलेल्या संशोधन आधारित निष्कर्ष, तंत्रज्ञान आणि विस्तार कार्य याची या योजनेची वार्षिक आढावा सभा कासारगोड येथे नुकतीच संपन्न झाली. यामध्ये केंद्राला गौरविण्यात आले. नारळाच्या विविध वाणांच्या बहुस्थानी चाचण्या, उत्पादन तंत्र, आंतरपिके आणि पीक संरक्षण यांचा आढावा सादर करण्यात आला.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे आणि संबंधित विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या संशोधन कार्याची ही पोच पावती आहे. संशोधन केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. किरण मालशे आणि कीटकशस्त्राज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी पुरस्कार स्वीकारला. संशोधन केंद्रावर कार्यरत आजी व माजी अधिकारी आणि कर्मचारी यांचे योगदान मोठे असल्याचे श्री. मालशे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!