‘आम्ही साहित्यप्रेमी’तर्फे ओरोसला २९ शनिवारी
पु.लं.च्या जयंतीनिमित्त 'पुल'कित उत्सव

सिंधुदुर्गनगरी : ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या नोव्हेंबरच्या मासिक कार्यक्रमानिमित्त शनिवारी २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता पु.ल.कित उत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व’ दिवंगत पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिन ८ नोव्हेंबर रोजी असल्याचे औचित्य साधून त्यांच्या साहित्यावर आधारित हा कार्यक्रम होणार आहे.
‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या साहित्यिक व्यासपीठाचा हा नववा मासिक कार्यक्रम आहे. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातील काही वल्लींचा परिचय करुन दिला जाणार आहे. यामध्ये सतीश लळीत (अंतू बर्वा), डॉ. सई लळीत (परोपकारी गंपू), वैदेही आरोंदेकर (नारायण), ॲड. सुधीर गोठणकर (सखाराम गटणे) या वल्लींविषयी बोलतील. पुरुषोत्तम लाडू कदम हे पुणे येथे भेटलेले ‘पु.ल.’ यावर अनुभवकथन करणार आहेत. याबरोबरच नम्रता रासम, प्रगती पाताडे, प्रिया आजगावकर, मेघना उपानेकर, मिताली मुळीक, सुस्मिता राणे व मनोहर सरमळकर पु.लं.च्या काही कविता व गाणी सादर करणार आहेत.
हा कार्यक्रम सर्वांना खुला आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व कार्यक्रम वेळेवर सुरु व्हावा, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.



