कोकणकन्या एक्स्प्रेस तब्बल आठ तास उशिराने खेड स्थानकात दाखल
मांडवी एक्स्प्रेसमधील तांत्रिक बिघाडाचा परिणाम : प्रवाशांचा खोळंबा

खेड : कोकण रेल्वे मार्गावरील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून त्याचा फटका शनिवारी गाडी क्रमांक १०१११ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–मडगाव कोकण कन्या एक्सप्रेसला बसला. खेड रेल्वे स्थानकावर पहाटे ३.०४ वाजता येणे अपेक्षित असलेली ही गाडी तब्बल आठ तास उशिराने सकाळी ११.१० वाजता स्थानकात दाखल झाली. त्यामुळे प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.
रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २६ जून) मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा परिणाम पुढील गाड्यांच्या वाहतुकीवर झाला. मांडवी एक्सप्रेसच्या थर्ड एसी इकॉनॉमी (3E) डब्यातील वातानुकूलन यंत्रणा खेड स्थानकापासूनच बंद पडल्याने प्रवाशांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. एसी बंद असल्याने डब्यात घुसमट निर्माण झाली आणि लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी प्रवाशांचे मोठे हाल झाले.
दरम्यान, रत्नागिरी रेल्वे स्थानकात मांडवी एक्सप्रेसचे इंजिन बदलण्यात आले. सुमारे २५ मिनिटांच्या थांब्यानंतर वातानुकूलन यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, या तांत्रिक बिघाडामुळे मांडवी एक्सप्रेस उशिराने धावली आणि त्याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरील इतर गाड्यांवरही झाला.
परिणामी, कोकण कन्या एक्सप्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या तसेच मुंबईकडे प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती अधिकृत रेल्वे माध्यमांवर तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



