रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची अवैध गोवंश मांसबाबत धडक कारवाई; एकाला अटक

रत्नागिरी : शहरातील उद्यमनगर येथे विनापरवाना गोवंश प्राण्यांचे मांस विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ५१ किलो ५०० ग्रॅम गोमांस, एक दुचाकी, डिपफ्रिजर असा एकूण १ लाख, ६, ४८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी लियाकत शौकत दावत (वय ४८, रा. ए-१६, लांजेकर नगर, उद्यमनगर, ता. रत्नागिरी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली २६ जून रोजी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यामध्ये चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक रत्नागिरी शहरामध्ये गस्त घालत असताना उद्यमनगर येथील लांजेकर नगर येथे लियाकत शौकत दावत हा याच्याकडे विनापरवाना गोवंश प्राण्यांचे मांस आढळून आले. त्याला पंचांसमक्ष ताब्यात घेऊन तसेच पशुधन विकास अधिकारी, रत्नागिरी यांच्याकडून प्राथमिक खात्री करून घेऊन त्याच्या ताब्यातील एकूण ५१ किलो ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लियाकत दावत याच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २०८/२०२६ भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३२५, सह महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम २०१५ चे कलम ५ (ब), ५ (क), ९ (अ), मो. वा. का. १९८८ चे कलम ६६ (१), १९२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, महिला सहायक पोलीस फौजदार स्वाती राणे, पोलीस हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, गणेश सावंत, सत्यजित दरेकर, अतुल कांबळे यांनी केली आहे.



