श्री गणेश वेदपाठ शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

संगमेश्वर : देवरूख श्री गणेश वेदपाठ शाळा येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रकारच्या उपयुक्त वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. स्टेट बँक ऑफ इंडिया देवरूख शाखेचे व्यवस्थापक निखिल भिडे आणि मदन वामन मोडक यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला.
यावेळी शाळेच्या परिसरात काजू, रातांबे, चिकू, पेरू, चिंच, नारळ, वड आणि पिंपळ आदी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. या वृक्षारोपणासाठी लागणाऱ्या रोपांचा तसेच खड्डे खोदून लागवड करण्यापर्यंतचा संपूर्ण खर्च मदन वामन मोडक आणि हेमंत श्रीपाद तांबे यांनी उचलून वेदपाठ शाळेला मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाला हेमंत तांबे उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांचे सहकार्य उपस्थितांनी आवर्जून नमूद केले. यावेळी वेदमूर्ती विज्जल आचार्य गुरुजी, शाळेचे विश्वस्त प्रकाश पत्की, मिलिंद जुवेकर, व्यवस्थापक मोहन कुलकर्णी, तसेच वेदपाठ शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान, शाळेलगतच्या नदीकाठी आमदार शेखर निकम यांच्या निधीतून गेल्या वर्षी उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीमुळे ही जागा सुरक्षित झाली असून, त्याच परिसरात वृक्षारोपण करून जागेचा पर्यावरणपूरक उपयोग करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री गणेश वेदपाठ शाळेच्या वतीने उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.


