आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

वृक्षसंवर्धन, सेंद्रिय शेती व ‘लाखी बाग’ संकल्पनेविषयी शेतकरी जनजागृती कार्यक्रम वायंगणी येथे उत्साहात

वायंगणी (रत्नागिरी) : कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, वायंगणी येथे उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली येथील RHWE विद्यार्थ्यांच्या वतीने “निसर्ग जपूया, शेती समृद्ध करूया” या संकल्पनेवर आधारित शेतकरी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला गोळप ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच संदीप तोडणकर, वायंगणी गावचे पोलिस पाटील नितीन खाडे, कृषी सहाय्यक सौ. दीपाली साळुंके, मुख्याध्यापक सौ. दीपिका माळी तसेच सदस्य सौ. शेडगे आणि सौ. राडिये, शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य व RHWE विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने झाली. यावेळी पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि शाश्वत शेतीविषयी घोषणा देत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली व श्री वायंगणेश्वर मंदिराच्या परिसरात वृक्षलागवड करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर, शेतकरी व ग्रामस्थांचे स्वागत करून कृषी दिनाचे महत्त्व, शेतकऱ्यांचे योगदान तसेच हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यानंतर गो-कृपा अमृतम् तयार करण्याची पद्धत, त्यातील घटक, त्याचे महत्त्व, वापर आणि पिकांवरील सकारात्मक परिणाम याविषयी माहिती देण्यात आली. तसेच BAIF संस्थेच्या कु. प्राजक्ता हटीटे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व व नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी विकसित केलेल्या ‘लाखी बाग’ संकल्पनेची माहिती देत नारळ बागेत जायफळ, काळी मिरी व दालचिनी यांसारख्या मसाला पिकांची आंतरपीक पद्धती समजावून सांगण्यात आली. तसेच जपानी शेतकरी मसानोबू फुकुओका यांनी विकसित केलेल्या बीजगोळा (Seed Ball) संकल्पनेची माहिती देऊन वृक्षसंवर्धन, जंगलांचे पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संरक्षणामधील त्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकऱ्यांना गो-कृपा अमृतम् चे कल्चर वितरित करण्यात आले. शेतकऱ्यांनी RHWE विद्यार्थ्यांशी विविध कृषी विषयांवर संवाद साधून शंकांचे निरसन करून घेतले या कार्यक्रमात साहिल भोसले, श्रीरंग भडेकर, योगेश गायकवाड, कौस्तुभ इंदप, अथर्व कांबळे, ओंकार हाके आणि प्रणय भटकर उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या उपयुक्त व लोकाभिमुख कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!