बस अपघातातील जखमी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ठाकरे शिवसेनेची जिल्हा रुग्णालयात तातडीने धाव

रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे-उक्षी मार्गावरील शीळ (फणसवळे पवार कोंड) येथे काल (२ जुलै) सकाळी ६:४५ ते ७ च्या सुमारास दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक झाली. यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. ही घटना समजताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल होत जखमींची विचापूस केली.
या अपघातात ११ ते १५ शाळकरी विद्यार्थी आणि बस चालक जखमी झाले असून, दोन विद्यार्थिनींच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दांडेआडम (भावे आडोम) येथून रत्नागिरीकडे पटवर्धन हायस्कूल व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या बसची समोरून जाणाऱ्या दुसऱ्या एसटी बसशी जोरदार धडक झाली. प्राथमिक अंदाजानुसार, एका बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. धडक एवढी तीव्र होती की दोन्ही बसेसच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. अपघात घडताच बसमधील विद्यार्थ्यांनी आरडाओरडा सुरू केला, तो ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवले.
या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील दोन विद्यार्थिनींच्या जबड्याला आणि दातांना जबर मार लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले आहे, तर काही विद्यार्थ्यांना प्राथमिक तपासणीनंतर घरी सोडण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या पालकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली होती.
अपघाताची बातमी समजताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तत्परता दाखवली. शिवसेनेचे रत्नागिरी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील आणि युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, उपशहर प्रमुख नितीन तळेकर, समाजसेवक आदेश (आबू) भाटकर यांनी तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली आणि जखमी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच रुग्णालयातील डॉक्टरांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांना तातडीने आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळण्याची व्यवस्था केली.



