‘लँडस्लाईड’चे मुख्य कारण शोधणार; चिपळूणकरांचे जीवन सुरक्षित करण्यात यश : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : लँडस्लाईडचे (दरड कोसळणे) मुख्य कारण शोधणे अत्यंत गरजेचे आहे. कशेडी घाटात कुठेही दरड कोसळलेली नाही, तर सपाट रस्त्यापासून डाव्या बाजूला सुमारे १५० ते २०० मीटरवर असलेला डोंगर सरकला असून, तो रस्त्यावर आला आहे. या घटनेची नेमकी कारणे शोधून त्याचा सविस्तर पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
परशुराम घाटाची आणि चिपळूण येथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, “घाटातील परिस्थिती तांत्रिकदृष्ट्या समजून घेण्यासाठी मी स्वतः तिथे जाऊन पाहणी केली असून अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. वेगळे तंत्रज्ञान वापरले आहे. आपणही परशुराम घाटात प्रत्यक्ष भेट देऊन तिथल्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा केला आहे, हे पाहण्याचे आवाहनही केले.
चिपळूणमधील पूरपरिस्थितीबाबत बोलताना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले, आज प्रांताधिकारी आणि इतर सर्व संबंधित विभागांकडून या परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली आहे. पूर्वी आपल्याला जी भीती वाटायची की पाणी खूप वर चढेल आणि मोठा धोका निर्माण होईल, तशी परिस्थिती आता चिपळूणमध्ये राहिलेली नाही. चिपळूणच्या लोकांचे जीवन सुरक्षित ठेवण्यात आम्ही पूर्णपणे यशस्वी झालो आहोत. तरीही, आपण सर्वांनी स्वतःची काळजी आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे.



