मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापूर तालुक्यातील चार दरडग्रस्त गावांवर अतिवृष्टी काळात प्रशासनाचे विशेष लक्ष

राजापूर : तालुक्यातील धोपेश्वर, महाळुंगे, वडदहसोळ आणि परुळे ही चार दरडप्रवण गावे अतिवृष्टीच्या काळात विशेष संवेदनशील असल्याने या गावांवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेऊन या भागांसाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

तालुक्यातील या चार गावांमध्ये एकूण ११४ दरडग्रस्त घरे असून त्यामध्ये ३७१ नागरिकांचा समावेश आहे. दरवर्षी मुसळधार पाऊस, भूस्खलन, जमिनीला भेगा पडणे, दरडी कोसळणे तसेच वीज पडून नुकसान होण्याच्या घटना घडत असल्याने प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजनांना प्राधान्य दिले आहे.

अतिवृष्टीच्या काळात विशेषतः रात्रीच्या वेळी या गावांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रांताधिकारी विश्वजित गाताडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, पोलीस, ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्वयंसेवकांचा समावेश असलेली विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत हवामानातील बदल, मुसळधार पावसाची स्थिती, भूस्खलनाची शक्यता यावर सातत्याने नजर ठेवली जाणार आहे.

धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरित करणे, पोलीस, आरोग्य विभाग, अग्निशमन दल आणि इतर संबंधित यंत्रणांशी समन्वय साधणे, तसेच आपत्कालीन मदत कार्य प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली आहे.

दरडग्रस्त भागातील नागरिकांना संभाव्य आपत्तीबाबत पूर्वसूचना देण्यात आल्या असून आवश्यकतेनुसार सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाळ्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि आपत्ती आल्यास तातडीने मदत मिळावी, यासाठी संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!