जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांची धोकादायक ठिकाणांची पाहणी
सुरक्षिततेच्या दृष्टीने व धोकादायक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना

रत्नागिरी : गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर उद्भवलेली परिस्थिती व धोकादायक ठिकाणे, घाट परिसर, पूल, रस्ते यांची जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. देवेंदर सिंह यांनी पाहणी करून संबंधित विभागांना सुरक्षिततेच्या दृष्टीने व धोकादायक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय करण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या.

तसेच तहसील कार्यालय लांजा येथील नियंत्रण कक्षाला भेट देऊन आढावा घेतला. लांजा तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मान्सून काळात घ्यावयाची दक्षता याबाबत संबंधित विभागांना मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना दिल्या.
त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी आज (२६ मे) तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेऊन राजापूर तालुक्यामध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. तसेच धोकादायक, दरडप्रवण क्षेत्रात, व पूर परिस्थितीमध्ये घ्यावयाची दक्षता याबाबत संबंधित विभागांना मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे राजापूर शहरातील पूर परिस्थिती उद्भवणाऱ्या ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली.



