जि. प. आदर्श शाळा शिवणे नं. २ येथे शैक्षणिक दहीहंडी उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा शिवणे नं. २ येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला आनंदाची जोड देत ‘शैक्षणिक दहीहंडी’ हा अभिनव उपक्रम मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, एकाग्रता, धाडस आणि संघभावना निर्माण व्हावी, तसेच शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांचा वापर व्हावा, या उद्देशाने शाळेत शैक्षणिक दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून हंडी फोडण्याचा अनोखा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. उपस्थित पालक व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
या शैक्षणिक दहीहंडीमध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी हंडी फोडल्यानंतर त्यामध्ये ठेवण्यात आलेले शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. खेळ, आनंद आणि शिक्षण यांचा सुंदर संगम या उपक्रमातून साधण्यात आला.
या उपक्रमासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य व खाऊ दत्ताराम जानू जोशी यांनी उपलब्ध करून दिला. तसेच रुहीका आशिष जोशी यांनीही विद्यार्थ्यांसाठी खाऊ दिला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि आनंदासाठी त्यांनी दिलेल्या या योगदानाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमाला शिवणे गावच्या सरपंच सौ. मनस्वी महेंद्र ठोंबरे, उपाध्यक्ष सौ. सुप्रीम संजय जोशी, सौ. रितिका आशिष जोशी, मुख्याध्यापक दिनेश काशिनाथ जाक्कर, अंगणवाडी सेविका ऋषाली शंकर जोशी तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक प्रदीप हरिश्चंद्र बोंद्रे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचे विविध टप्पे उत्स्फूर्तपणे पार पाडत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकण्याची गोडी निर्माण करणारा आणि पारंपरिक दहीहंडीला शैक्षणिक उपक्रमाची जोड देणारा हा अभिनव उपक्रम उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला. ‘खेळातून शिक्षण आणि आनंदातून ज्ञान’ हा संदेश देणारी ही शैक्षणिक दहीहंडी विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहणारी ठरली.



