दापोलीतील वराडकर-बेलोसे महाविद्यालयात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती साजरी

दापोली : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार एन. के. वराडकर कला व आर. व्ही. बेलोसे वाणिज्य महाविद्यालय, दापोली येथे माजी उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत द. कऱ्हाड यांनी स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. जयंतीचा दिवस असला तरी त्यांच्या अकाली निधनाची वेदना उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होती. त्यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही अनेकांच्या मनात कायम असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.
यानंतर प्रा. सुरेश खरात यांनी स्व. अजित पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्य, नेतृत्व, जनसामान्यांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते तसेच त्यांच्यासोबतच्या काही आठवणी उपस्थितांसमोर सांगितल्या. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शांत आणि आदरपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



