जगबुडी पुलाला तातडीने ‘ब्लॅक स्पॉट’ घोषित करा
भाजपा नेते ॲड. वैभव खेडेकर यांची मागणी : आरटीओ अधिकाऱ्यांना विचारला जाब

खेड : येथील जगबुडी नदी पुलावरून कंटेनर थेट नदीपात्रात कोसळल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर या पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच भाजप नेते तथा खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना (आरटीओ) जाब विचारत जगबुडी पुलाला तातडीने ‘ब्लॅक स्पॉट’ घोषित करण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना ॲड. खेडेकर यांनी सांगितले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जगबुडी नदीचा पूल हा अनेक वर्षांपासून अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जात आहे. या पुलावर यापूर्वीही अनेक गंभीर तसेच किरकोळ अपघात घडले असून, अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. आम्ही वारंवार मागणी करूनही तसेच अपघात होऊनही संबंधित यंत्रणांकडून या ठिकाणाला अधिकृतपणे ‘ब्लॅक स्पॉट’ घोषित करण्यात आलेले नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
तसेच महामार्गावरून क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड ट्रक आणि कंटेनरमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचे निदर्शनास आणून देत, अशा वाहनांवर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांकडे केली. वाहनांच्या वजनाची नियमित तपासणी, वेगावर नियंत्रण आणि नियमांचे काटेकोर पालन झाल्यास अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी संबंधित मागण्यांची दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, जगबुडी पुलावरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना, प्रभावी वाहतूक नियंत्रण आणि अपघात प्रतिबंधक उपाय तातडीने राबविण्याची मागणी नागरिकांकडूनही जोर धरू लागली आहे.



