स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कामगिरी; मोबाईल स्नॅचिंग प्रकरण उघडकीस
तीन आरोपी अटक : १०० टक्के मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : अलोरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोबाईल स्नॅचिंगच्या दोन घटनांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने यशस्वी छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २१ मे २०२६ रोजी सायंकाळी पवारवाडी फाटा येथे आशिष कृष्णा जाधव यांना चिपळूणचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला होता. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात शिरगाव रहाटवाडी येथील दत्त मंदिरासमोर रिया रोहित शिंदे यांचाही याच पद्धतीने मोबाईल हिसकावून आरोपी पसार झाले होते.
या प्रकरणी अलोरे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०४(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने २२ जुलै २०२६ रोजी सांगली जिल्ह्यातील वांगी (ता. कडेगाव) येथे धाड टाकून विश्वनाथ अमर शिंदे (२३), प्रथमेश मलिक मोरे (२०) आणि अक्षय संभाजी जाधव (२३) या तिघांना ताब्यात घेतले.
सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले मोबाईल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा ₹१,०८,००० किमतीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी अलोरे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार योगेश नार्वेकर, विजय आंबेकर, दिपराज पाटील तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.



