मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

श्रीराम विद्यालयात नाट्य प्रशिक्षण शिबिर उत्साहात; अभिनेत्री अर्चना पेनकर यांनी विद्यार्थ्यांना दिले अभिनयाचे धडे

लांजा : वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचालित श्रीराम विद्यालय व तुकाराम पुंडलिक शेटे कनिष्ठ महाविद्यालय, वेरवली बुद्रुक येथे इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष नाट्य प्रशिक्षण शिबिराचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, अभिनयाची आवड जोपासली जावी तसेच त्यांच्यात आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि सादरीकरणाची क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री सौ. अर्चना पेनकर यांची उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना नाट्यकलेची मूलभूत तत्त्वे अतिशय सोप्या, रंजक आणि प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगितली. अभिनय ही केवळ कला नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना रंगमंचावरील आत्मविश्वासाचे महत्त्व पटवून दिले.

शिबिरादरम्यान अर्चना पेनकर यांनी केवळ तात्त्विक मार्गदर्शन न करता विविध अभिनय प्रकारांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखवली. विद्यार्थ्यांनाही विविध प्रसंग, संवाद आणि लघुनाटिकांमधून अभिनय करण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत अभिनयाचे विविध पैलू अनुभवले.

शिबिरात सभाधीटपणा, संवाद कौशल्य, व्हॉईस मॉड्युलेशन, स्पष्ट उच्चार, शरीरबोली, चेहऱ्यावरील हावभाव आणि पात्रानुसार अभिनयातील बदल या महत्त्वाच्या विषयांवर विशेष भर देण्यात आला. रंगमंचावर भीती न बाळगता आत्मविश्वासाने कसे उभे राहावे, संवाद प्रभावीपणे कसा सादर करावा, तसेच शरीरबोलीच्या माध्यमातून पात्र अधिक जिवंत कसे करावे, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रसंग सादर करून आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवली.

विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन केल्याबद्दल संस्थेचे सचिव श्री. संतोष पडवणकर यांच्या शुभहस्ते सौ. अर्चना पेनकर यांचा सन्मानचिन्ह आणि लेखणी देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तसेच विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण शिबिरात विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील भीती दूर करून रंगमंचावर आत्मविश्वासाने अभिनय सादर केला. शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये संवादकौशल्य, सादरीकरणाची कला आणि व्यक्तिमत्त्व विकासाबाबत सकारात्मक बदल घडून आल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे, प्रमुख मार्गदर्शक सौ. अर्चना पेनकर यांचे तसेच आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे नाट्य प्रशिक्षण शिबिर अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!