तिवरे पुलावरून नदीत पडून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

चिपळूण : तालुक्यातील तिवरे फणसवाडी येथील पुलावरून तोल जाऊन नदीपात्रात पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजवर्धन किरण संगा (वय २०, रा. मूळ सोलापूर, सध्या खेडी, चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना ३१ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६.३५ वाजता घडली.
राजवर्धन हा त्याचा मित्र मोहम्मद नासीर अब्दुल रहीम खान याच्यासोबत तिवरे फणसवाडी येथील पुलावर होता. यावेळी गाडीच्या काचा पुसत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो पुलावरून नदीपात्रात पडला. नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने तो वाहून गेला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्याचा शोध सुरू केला. काही वेळानंतर तिवरे येथील गंगेचीवाडी परिसरात नदीकाठच्या झाडांमध्ये अडकलेल्या अवस्थेत राजवर्धन आढळून आला. त्याला तातडीने कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी मोहम्मद नासीर अब्दुल रहीम खान यांनी दिलेल्या माहितीनुसार अलोरे पोलिस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अलोरे पोलिस करीत आहेत.



