जागतिक स्तरावर रत्नागिरीला उज्ज्वल करण्यासाठी प्रशासन कार्यरत
८० व्या स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री उदय सामंत यांनी मांडला जिल्ह्याच्या विकासाचा आलेख

रत्नागिरी : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्ह्याच्या विकासाचा वेगवान आलेख जनतेसमोर मांडला. विमानतळ, पर्यटन, रोजगार आणि शेतकरी हिताच्या अनेक महत्त्वपूर्ण कामांचा यात समावेश होता. रत्नागिरीला जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याने, सहभागाने माझ्यासह प्रशासन कार्यरत असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी दिली.
पोलीस परेड मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक बाबुराव महामुनी, जि.प. अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यासह प्रमुख अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
“प्रशासन आपल्या दारी” हा मंत्र घेवून, वर्षभरात जिल्हा प्रशासनाने लोकाभिमुखतेचा एक नवा आदर्श राज्यासमोर ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या माध्यमातून यावर्षी १ लाख १७ हजार ९०७ लाभार्थ्यांना एकाच छताखाली विविध लाभ देण्यात आला आहे. यामधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे १ हजार ३२३ महिलांना ‘शेतकरी महिला’ म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आल्याचे पालकमंत्री डॉ. सामंत आपल्या मार्गदर्शनात म्हणाले.
जिल्हा नियोजन समितीचा गेल्यावर्षीचा ४०६ कोटींचा निधी १०० टक्के खर्च झाला असून यावर्षी ४३९ कोटींपर्यंत निधी शासनाने वाढवला आहे. यातूनच ग्रामपंचायतींच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय, ग्रामीण भागातील टॅलेंट शोधून मुलांना थेट ‘इस्रो आणि नासा’ ला पाठवण्याचा देशातील पहिला यशस्वी उपक्रम जिल्ह्यात राबवला गेला आहे.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, सर्व परवानग्या पूर्ण झाल्या असून, येत्या २-३ महिन्यांत रत्नागिरीतून मुंबई आणि पुण्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे. यासोबतच भाट्यामध्ये ‘सी-प्लेन’ सेवा, हाऊसबोट टर्मिनल, पंचतारांकित हॉटेल, तरुणांना रोजगारासाठी ‘ग्रीन स्टील प्रकल्प’, ‘शिप बिल्डिंग’, ‘सी एन जी गॕस’ आणि ‘डिफेन्स क्लस्टर’ची उभारणी केली जाणार आहे. महिलांसाठी काजू बोंडापासून ज्यूस बनवण्याचा पहिला उद्योग सुरू करण्यात येईल. आणि २५ कोटी रुपये खर्चाचे अद्ययावत मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. देशातील ‘मातृभाषेचे पहिले संग्रहालय’ रत्नागिरीत साकारले जाणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्यरुग्ण संख्या आज ४०० वरून ९०० पर्यंत पोहोचली आहे. उद्यमनगर येथे ३० खाटांचे अत्याधुनिक आयुष रुग्णालय उभारण्यात येत आहे. रत्नागिरीमध्ये बीएसी नर्सिंग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, १५० कोटी रुपयांमधून पोलीस अधिक्षकांचे अद्ययावत कार्यालय, पोलीसांना राहण्यासाठी घरे उभारण्यात येत आहे. सहा महिन्यात त्याचे उद्घाटन होईल.
तरुणांना व्यसनापासून व अंमली पदार्थापासून वाचवण्यासाठी पोलीस दलाने कडक कारवाई करत ५० आरोपींना अटक तर १२ जणांना हद्दपार करण्यात आले आहे असून आणखी १२ जण हद्दपारीच्या वाटेवर आहेत. अंमली पदार्थापासून जिल्हा मुक्त करण्यासाठी पोलीस दलाने पावले उचलली असून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकरी बांधवासाठी पावसाच्या अचूक नोंदीसाठी आता प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसवले जाईल. आंबा-काजू बागायतदारांच्या नुकसानीपोटी ५६ हजार ६२८ शेतकऱ्यांना ९८ कोटी ४४ लाखांची भरपाई थेट खात्यात देण्यात आली आहे. एमआयडीसीत ३० कोटी रुपये खर्चून बांधले जाणारे क्रीडा संकुल ३ महिन्यांत सुरू होईल. प्रधानमंत्री आवास योजनेत ६ हजार १३६ घरकुले, मोदी आवास योजनेत ५ हजार ४१८ घरकुले पूर्ण झाली आहेत.
“रत्नागिरीचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी प्रशासन जीव ओतून काम करत आहे, असे सांगून पालकमंत्र्यांनी पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी परेड निरीक्षण केले. यानंतर. परेड कमांडर परिविक्षाधीन पोलीस उप अधिक्षक अभिजित थोरात यांच्या नेतृत्वाखाली संचलनास प्रारंभ झाला. पोलीस उपनिरीक्षक अभय तेली यांच्या नेतृत्वाखाली पोलीस मुख्यालय पथक १, परिविक्षाविधीन पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस मुख्यालय पथक २, परिविक्षाविधीन पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस मुख्यालय पथक ३, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक सिध्दी सावंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस महिला पथक, हवालदार यशवंत माने यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस बँड पथक, पलटन नाईक चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा गृह रक्षक दल, पलटन नाईक मीनाक्षी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महिला गृह रक्षक दल, पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली ॲलेक्स श्वान पथक, जवाहर नवोदय विद्यालय स्टूडंट पोलीस कॅडेट, अग्नीशमन दल, रुग्णवाहिका यांचा समावेश होता.
पोलीस अतिउत्कृष्ट सेवा पदक पुरस्कार- पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, नितीन ढेरे, पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ गुरव, संजय साळवी, पोलीस हवालदार निशा केळकर, वैदेही कदम, महेश गुरव, आशिष शेलार. उत्कृष्ट सेवा पदक २०२६- पोलीस निरीक्षक अमित यादव, फुलचंद मेंगडे, पोलीस हवालदार विजय आंबेकर, अमोल गमरे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी व ८ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार- प्रणय कांबळे, स्पृहा जोशी, आरोही केदारी, काव्या यादव, आरोही चव्हाण, शर्विल पाटील, शाश्वत ओकाटे, रुद्रा कदम, अद्वैत क्षिरसागर, सोहम मोहिते, प्रसाद जाधव, अमेय नांदिवडेकर, आराध्य देसाई यांचा पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ४ थी व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ७ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार- राजवर्धन काळे, क्रिपाळ कांबळे, निर्मय पवार, भूमी भिंगार्डे, दक्ष निर्मळ, किरण शिंदे, अर्णव शिंदे, आयुष जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
मुख्य सोहळ्यास नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



