जीजीपीएस प्रशालेच्या कै. बाबुराव जोशी गुरुकुलात रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेनिमित्त विविध उपक्रम

रत्नागिरी : शहरातील जीजीपीएस प्रशालेच्या कै. बाबुराव जोशी गुरुकुलात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून यावर्षी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम उत्साहात राबविण्यात आले.
२७ ऑगस्ट रोजी इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनारी भेट देऊन समुद्राला नारळ अर्पण केला. यावेळी विद्यार्थ्यांनी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छताही केली. पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा संदेश देत विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
याच दिवशी इयत्ता दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी देवरुख येथील ‘गोकुळ’ या अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेला तसेच ‘साहस’ या विशेष मुलांसाठी कार्य करणाऱ्या प्रकल्पाला भेट दिली. तेथील मुला-मुलींसोबत विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन साजरे केले. प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंददायी आणि संस्मरणीय ठरला. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी २८ ऑगस्ट रोजी प्रशालेतील विद्यार्थीनींनी रत्नागिरी बसस्थानक, रत्नागिरी नगरपालिका आणि रत्नागिरी पोलीस ठाणे येथे जाऊन रक्षाबंधन साजरे केले. विविध क्षेत्रांत सेवा बजावणाऱ्या व्यक्तींना राखी बांधून विद्यार्थीनींनी कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त केली.
रक्षाबंधनापूर्वी विद्यार्थ्यांना विक्रीचा अनुभव मिळावा यासाठी छोट्या स्वरूपात ‘राखी विक्री’ उपक्रमही घेण्यात आला. यातून जमा झालेल्या रकमेतून तसेच गुरुकुलातील काही शिक्षक व पालक यांनी स्वेच्छेने दिलेल्या रकमेतून ‘गोकुळ’ व ‘साहस’ या संस्थेतील मुलांना खाऊ व काही रक्कम देणगी स्वरूपात देण्यात आली.
या सर्व उपक्रमांमध्ये गुरुकुलातील सर्व शिक्षकांनी अतिशय मनापासून व उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी, पर्यावरणप्रेम, सेवा आणि माणुसकीची जाणीव व्हावी, हा या सर्व उपक्रमांचा मुख्य उद्देश होता.
संपूर्ण उपक्रम गुरुकुल प्रमुख वासुदेव परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली, जीजीपीएस प्रशालेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर तसेच र. ए. सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने उत्साहात पार पडला.


