भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणतर्फे भव्य मंगळागौर सोहळ्याचे आयोजन
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची उपस्थिती : मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

रत्नागिरी : महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपत महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, रत्नागिरी दक्षिणच्या वतीने भव्य मंगळागौर स्पर्धा व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, संपर्क मंत्री नितेश राणे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकारांची उपस्थिती. ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी (राणादा), अक्षया देवधर (मास्तरीणबाई), ‘बानू’ फेम ईशा केसकर, प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ फेम गिरीजा प्रभू या कलाकारांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा वर्षा परशुराम ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या सोहळ्यात पारंपरिक मंगळागौरीचे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिलांसाठी विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
“मंगळागौर हा केवळ मनोरंजनाचा उत्सव नसून महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा आणि महिला शक्तीच्या एकतेचा उत्सव आहे. आधुनिक युगातही आपली परंपरा जतन करण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे,” असे वर्षा ढेकणे यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहितीही देण्यात येणार असून महिलांनी योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हावे, यासाठी महिला मोर्चा प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरीतील सर्व माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मंगळागौर सोहळ्याचा आनंद घ्यावा आणि आपल्या लाडक्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी साधावी, असे आवाहन वर्षा ढेकणे यांनी केले आहे.

