संरक्षण दलातील ‘एसएसबी’ मुलाखत पूर्वतयारीसाठी नाशिक येथे मोफत प्रशिक्षण; १५ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत मुलाखती

रत्नागिरी : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड’ (SSB) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड (नाशिक) येथे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी ‘एसएसबी कोर्स क्र. ६६’ दि. २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पार पडणार असून, यामध्ये निवडक उमेदवारांना मोफत प्रशिक्षण, निवास व भोजनाची सोय केली जाणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
उमेदवारांनी CDSE-UPSC किंवा NDA-UPSC लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन SSB मुलाखतीसाठी पात्र असणे आवश्यक आहे. NCC ‘C’ प्रमाणपत्र परीक्षा ‘A’ किंवा ‘B’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण आणि NCC ग्रुप हेडक्वार्टरकडून SSB साठी शिफारस प्राप्त, टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) साठी SSB मुलाखतीचे कॉल लेटर प्राप्त असणे, तसेच युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीम (UES) साठी SSB कॉल लेटर किंवा शिफारस यादीत नाव असणे आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवारांनी सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील (DSW Portal – Resources – PCTC Nashik – SSB 66) किंवा व्हॉट्सॲप क्र. ९१५६०७३३०६ वरून प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टांची प्रिंट काढून ती पूर्ण भरून मुलाखतीवेळी सोबत आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड यांच्याशी training.pctcnashik@gmail.com या ई-मेलवर, दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सॲप क्र. ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन प्र. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.


