मुख्य बातमी

आंबव येथील अभियांत्रिकी महाविद्यालय परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

रत्नागिरी : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित ‘युजीसी नीट जून २०२६’ ही परीक्षा संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील ‘राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी’ या केंद्रावर ९ आणि १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ७ या वेळेत घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या २०० ते ३०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये हे आदेश लागू केले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेशातील ठळक बाबी

शांतता भंग करण्यास मनाई : परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीकडून शांततेला बाधा निर्माण होईल, असे कृत्य करण्यास सक्त मनाई राहील.

दुकान व सेवा बंद : परीक्षा केंद्राच्या २०० ते ३०० मीटर परिसरातील एसटीडी बूथ, झेरॉक्स सेंटर्स, टायपिंग सेंटर्स आणि ध्वनिक्षेपक यंत्रणा परीक्षा कालावधीत पूर्णपणे बंद राहतील.

उपकरणांवर निर्बंध : परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल, सेल्युलर फोन, फॅक्स अथवा अन्य इलेक्ट्रॉनिक संप्रेषण साधने सोबत बाळगण्यास मनाई असेल.

प्रवेश बंदी : कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला अथवा वाहनाला परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश करण्यास मनाई असेल. तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्यात अडथळा निर्माण करण्यास बंदी राहील.

हे निर्बंध परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी व बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांना त्यांची शासकीय कर्तव्ये पार पाडण्यासाठी लागू नसतील; मात्र त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!