आरोग्यमुख्य बातमी

शाळा-महाविद्यालयांमध्ये तंबाखूविरोधी जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवा

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरी : तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर दुष्परिणाम, तंबाखूजन्य पदार्थांमुळे उद्भवणारे विविध आजार तसेच युवकांमध्ये वाढत असलेले तंबाखू सेवनाचे प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP) अंतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश मा. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी संबंधित विभागांना दिले.

काल (८ सप्टेंबर) जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा समन्वय तथा सनियंत्रण समितीची सभा आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

शाळा व महाविद्यालयांमध्ये तंबाखूविरोधी जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, समुपदेशन सत्रे आदी उपक्रम नियमितपणे आयोजित करावेत. विद्यार्थ्यांना तंबाखू सेवनामुळे होणारे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम तसेच तंबाखूमुळे होणारे कर्करोग, हृदयरोग, श्वसनविकार याबाबत शास्त्रीय माहिती देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले.

तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणार नाही, तसेच परिसर तंबाखूमुक्त राहील, यासाठी संबंधित यंत्रणांनी नियमित पाहणी करावी. COTPA कायद्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले.

तंबाखूविरोधी जनजागृती अधिक प्रभावी करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच समाजातील विविध घटकांचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा. युवकांमध्ये तंबाखू सेवनाची सुरुवात होऊ नये आणि व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींना योग्य समुपदेशन व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात यावा.

युवक हे देशाचे भविष्य असून त्यांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. त्यामुळे “तंबाखूला नकार, निरोगी जीवनाला स्वीकार” हा संदेश जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयापर्यंत पोहोचवून तंबाखूमुक्त पिढी घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!