
जीवन म्हणजे सुख-दुःख, यश-अपयश, आशा-निराशा यांचा प्रवास. प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतात. मात्र, एखादा कठीण क्षण म्हणजे संपूर्ण आयुष्याचा शेवट नसतो. संकट कितीही मोठे असले तरी त्यातून मार्ग शोधता येतो, मदत घेता येते आणि परिस्थितीत बदल घडवून आणता येतो.
आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव, एकटेपणा, कौटुंबिक समस्या, आर्थिक अडचणी, नात्यांमधील संघर्ष, अपयश किंवा मानसिक आरोग्याशी संबंधित अडचणी यामुळे काही व्यक्तींना जीवन असह्य वाटू शकते. अशा वेळी त्या व्यक्तीला सर्वात जास्त गरज असते ती दोष देण्याची किंवा न्याय करण्याची नाही, तर समजून घेणाऱ्या मनाची.
“ऐका… कारण कदाचित कोणीतरी मदतीसाठी हाक देत असेल!”
आपल्या आसपासची एखादी व्यक्ती सतत निराश दिसत असेल, लोकांपासून दूर जात असेल, स्वतःबद्दल नकारात्मक बोलत असेल किंवा जीवनाबद्दल निराशा व्यक्त करत असेल, तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमाने आणि आपुलकीने विचारा—
“तुला काय वाटतंय? मी तुझ्यासोबत आहे.”
कधी कधी मनातील वेदना व्यक्त करण्याची संधी मिळणे हीच मदतीची पहिली पायरी ठरते. त्यामुळे अशा व्यक्तीचे बोलणे शांतपणे आणि सहानुभूतीने ऐकणे, तिच्या भावनांना कमी लेखू नये किंवा दोष देऊ नये. आवश्यक असल्यास तिला समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञ किंवा जवळच्या आरोग्यसेवेशी जोडणे महत्त्वाचे आहे.
आत्महत्या प्रतिबंध ही प्रत्येकाची जबाबदारी
आत्महत्या प्रतिबंधासाठी समाजात मानसिक आरोग्याबाबत मोकळेपणाने आणि संवेदनशीलतेने संवाद होणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या ही कमजोरी नसून, योग्य वेळी मदत, समुपदेशन आणि उपचार मिळाल्यास त्यामध्ये सुधारणा होऊ शकते.
आपल्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील किंवा समाजातील व्यक्तींमध्ये होणारे भावनिक व वर्तनातील बदल ओळखणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांना दोष न देता समजून घेणे आणि आवश्यक वेळी व्यावसायिक मदत मिळवून देणे ही प्रत्येकाची महत्त्वाची भूमिका आहे.
एक फोन, एक भेट, एक प्रेमळ शब्द किंवा काही मिनिटे शांतपणे ऐकून घेणेही एखाद्या व्यक्तीसाठी आशेचा किरण ठरू शकतो.
📞 मदत हवी आहे? बोलून दाखवा!
टेली-मानस (Tele-MANAS) – १४४१६
टोल-फ्री मानसिक आरोग्य हेल्पलाइन
मानसिक ताण, चिंता, नैराश्य, भावनिक अडचणी किंवा आत्महत्येचे विचार येत असल्यास १४४१६ वर संपर्क करून व्यावसायिक मानसिक आरोग्य मदत घेता येते.
लक्षात ठेवा…
समस्या कायमची नसते; पण जीवन अमूल्य असते.
निराशेला नाही—आशेला साथ देऊया!
मौनाला नाही—संवादाला सुरुवात करूया!
आणि प्रत्येक मौल्यवान जीवन जपूया!
“मन ऐका… हात द्या… आशा द्या… जीवन जपा!”
– श्रीमती स्मिता सुहास गोठणकर
सामाजिक आरोग्य परिचारिका,
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम,
जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी



