मुख्य बातमी

कोकण परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून जिल्ह्यातील गणेशोत्सव बंदोबस्त व महामार्ग व्यवस्थेचा आढावा

रत्नागिरी : जिल्ह्यातील आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा व्हावा, यासाठी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीणा (भा.पो.से.) यांनी ८ व ९ सप्टेंबरला रत्नागिरी जिल्ह्यास भेट देऊन गणेशोत्सव बंदोबस्ताचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेची तसेच महत्त्वाच्या गणेश विसर्जन ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली.

जिल्ह्यात या वर्षी एकूण १२७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये तसेच १,६९,५३८ खासगी गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात समुद्रकिनारे, खाड्या, नद्या व तलाव आदी ठिकाणी सार्वजनिक व खासगी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार असून, सर्व विसर्जनस्थळांवर आवश्यक सुरक्षा व बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एकूण ५८ पोलीस अधिकारी व ६५० पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच अत्याधुनिक हत्यारे व आवश्यक साधनसामग्रीने सज्ज असलेली “आरसीपी”ची २ पथके व “क्यूआरटी”ची २ पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय “एसआरपीएफ”ची एक कंपनी तैनात करण्यात येणार असून, अतिरिक्त ५०० होमगार्ड तसेच २० पोलीस अधिकारी व १०० पोलीस अंमलदार यांचीही बंदोबस्तासाठी मागणी करण्यात आली आहे.

गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, विसर्जनस्थळांची सुरक्षा तसेच सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. महामार्गावर एकूण १४ ठिकाणी फिक्स पॉइंट नेमण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सव काळातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर एकूण १४ ठिकाणी नियोजित पेंडॉल (फिक्स पॉइंट) उभारण्यात आले आहेत.

या सर्व महत्त्वाच्या बंदोबस्त पॉइंटची विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक नियोजन, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था व उपलब्ध मनुष्यबळाबाबत आवश्यक सूचना दिल्या तसेच त्यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.

गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चाकरमान्यांची तसेच गणेश भक्तांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी ५९ ॲम्ब्युलन्स व ३३ क्रेन्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडीच्या ठिकाणांचा तसेच अरुंद पूल, बॉटलनेक पॉइंट आणि ब्लॅक स्पॉट आणि प्रामुख्याने खेड जगबुडी पूल, चिपळूण वाशिष्ठी नदी पूल, संगमेश्वर शास्त्री पूल, लांजा – अंजणारी पूल व वेरळ घाट यांचा विशेष आढावा घेण्यात आला.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीणा यांच्यासमवेत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, पोलीस उपअधीक्षक आरांक्षा यादव, रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!