मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आमची भगिनी आर्थिक सक्षम होऊन स्वाभिमानाने जगली पाहिजे : निलेश सांबरे

आबलोली (संदेश कदम) : “जिजाऊ संस्थेमार्फत गेले २८ वर्ष प्रयत्न करतोय की, विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे तसेच आपल्या समाज बांधवांना उत्तम आरोग्यही मिळाले पाहिजे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून नुसतं टीव्ही बघून, मोबाईलच्या मागे लागून रिकामपणे या ओटीवरून त्या ओटीवर जाणाऱ्या भगिनींपेक्षा आमची भगिनी आर्थिक सक्षम होऊन स्वाभिमानाने जगली पाहिजे, यासाठी महिला सक्षमीकरणासाठी जिजाऊ संस्थेने पुढाकर घेतला आहे,” असे प्रतिपादन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांनी केले.

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सचिन कारेकर यांच्या गारवा कृषी पर्यटन केंद्र येथे मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन “जिजाऊ”चे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री. सांबरे म्हणाले, “आमच्या भगिनीला आजारपणात पैशांसाठी मुलाकडे किंवा नवऱ्याकडे हात पसरावे लागतात. एखादी आवडीची वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे न दिल्यामुळे तिचा स्वाभिमान कुठेतरी दुखावला जातो. प्रत्येकाच्या आजारपणात काळजी घेणाऱ्या स्त्रीला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनंत अडचणी येतात. अशा परिस्थितीत बघताना तिचा स्वाभिमान जपायला हवा. ती स्वाभिमानाने जगली पाहिजे अशा दृष्टीने महिला सक्षमीकरण नावाचे काम जिजाऊ संस्थेमार्फत हाती घेतले आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही माझ्या भगिनींना आर्थिक सक्षम करणारच.”

ते पुढे म्हणाले की, “देशाच्या राष्ट्रपती आमच्या भगिनी आहेत. उद्योग व्यवसायातील आमच्या भगिनी उच्च पदावर पोहोचल्या पाहिजेत. शिक्षणात ही आपल्या भगिनी पुढे आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये डांबोरी अल प्रकल्प आहे., तिथे देशांमध्ये दुसरी आलेली आपली भगिनी प्रकल्प अधिकारी म्हणून दोन दिवसापूर्वी नियुक्त झाली. आज भगिनी पुढे येत आहेत. रेल्वे, विमान चालवत आहे, मग आमच्या रत्नागिरीमधल्या भगिनीं मुलांकडे, नवऱ्याकडे हात न पसरता त्या मुलांना नवऱ्याला पैसे देणाऱ्या झाल्या पाहिजेत. ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर शहरात येथे गेलो तेथे महिला बचत गटाने 1958 साली शाळा काढली आजही महिला बचत गट ती शाळा चालवतात कुठच्याही शिक्षकाला पैसे न देता स्वतःचे योगदान स्वतः देतात आणि शाळा चालवतात. मला उद्या रत्नागिरीत तशी शाळा निर्माण करायची आहे त्यासाठी निधी आपण निर्माण करू आणि आमच्या भगिनी या शाळा सांभाळतील याची मला खात्री आहे.”

आबलोली येथे महिलांना प्रशिक्षणासाठी मोफत जागा देणाऱ्या सचिन कारेकर यांचाही निलेश सांबरे यांनी गौरव केला. यावेळी विचारपीठावर महाराष्ट्र राज्याचे सचिव चव्हाण, उद्योजक वसंत उदेग, पोलीस पाटील महेश भाटकर, सरपंच सौ. वैष्णवी नेटके, गारवा कृषी पर्यटन केंद्राचे मालक आणि प्रगतशील शेतकरी सचिन कारेकर, जिजाऊ संस्थेचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते ॲड. प्रसाद जांगळे, ओमकार तीवरेकर, अनंत डिंगणकर यांच्यासह बचत गटाच्या सीआरपी तसेच बचत गटांच्या महिला आणि निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सर्व सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी बाबुराव सूर्यवंशी तसेच जिजाऊ संस्थेचे अमर राऊत यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!